नेते फॉर्मात, कार्यकर्ते सावध भूमिकेत

गणेश घाडगे
नेवासा  – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नेवासा मतदारसंघात उमेदवार व नेते फॉर्मात दिसत असून, कार्यकर्त्यांची भूमिका सावध दिसत आहे. पक्ष व अपक्षाचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. कोण कार्यकर्ता कोणाचा आहे, याबाबत सगळीकडेच संभ्रम आहे. त्यामुळे एकमेकांकडे संखयाने पाहिले जात आहे. आपला कोण व विरोधकांचा कोण, हेच सध्या उमेदवारांना समजेनासे झाले आहे.

राजकरणात कायम कोणी मित्र व शत्रू राहात नाही. दोन भिन्न तत्त्वप्रणालीचे पक्ष व त्यांचे नेते पक्षाचा त्याग करीत आहेत. जे पक्षात होते ते बाहेर पडले आहेत. मात्र त्यात येथील कार्यकर्ते भरडले जात आहेत. काय करावे, असा विचार करीत आहेत. आमचे प्रेम अमक्‍यावर आहे, तर मी त्याचे काम करेल. परंतु प्रेमाला राजकरणात स्थान नाही.

येथे परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, लागतो असे बाळकडू दुसरे पाजत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. स्वतःचे आगळे-वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकरणात कटू निर्णय तत्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहेत. काल एकमेकांचे कट्टर वैरी आता एका बॅनर खाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकरणात काहीही होऊ शकते, याची प्रचिती येथे सध्या येत आहे.

प्रत्येक गावावर नजर
नेवासा मतदारसंघात नेत्यांनी प्रत्येक गावावर बारीक नजर आहे. तसेच कार्यकर्ते दुसऱ्या गटात जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र काही नेते व कार्यकर्ते कुंपणावर आहेत. पूर्वी मोठ्या नेत्यांसोबत राहणारे नेते सध्या भूमिगत दिसत आहेत. त्यामुळे राजकीय कौशल्य पणाला लावूनच निवडणूक कशी जिंकता येईल, यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.

नेत्यांची लावली फिल्डिंग
मतदारसंघात राजकीय पक्ष, नेत्यांची मोठी फिल्डिंग लावली आहे. अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जोखीम नको म्हणून वरिष्ठ नेत्यांनी दुसऱ्या नेत्यांची येथे नेमणूक केली आहे. वरिष्ठ नेते येथे संध्याकाळी रात्री दररोजची माहिती नेमणूक केलेल्या नेत्यांकडून घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.