नवी दिल्ली – भारत हा जगातील वाहन उद्योगातील पाचवा मोठा देश समजला जात होता. त्यामुळे विदेशातील अनेक नामांकित कंपन्या मोठ्या उत्साहाने भारतात प्रवेश करत्या झाल्या. पण आता मात्र चित्र पुर्ण पालटले असून गेल्या पाच वर्षात सहा मोठ्या ऑटो कंपन्यांनी भारतातील गाशा गुंडाळला असून त्यामुळे भारतातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारावर त्याचा बिकट परिणाम झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
आधीच भारतातील हजारो उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. आता मोठ्या कंपन्याही काढता पाय घेत असल्याने रोजगाराची देशातील स्थिती आणखीनच बिकट बनली आहे.
चालू महिन्यात फोर्ड कंपनीने भारतातील आपले ऑपरेशन बंद करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीची फिगो, अस्पायर, फ्रीस्टाईल, इकोस्पोर्टस ही मोटारींची मॉडेल लोकप्रिय झाली होती. या कंपनीची गुजरात आणि तामिळनाडुत उत्पादन युनिटे होती ती आता बंद पडली आहेत.
फोर्ड कंपनीला भारतातील उत्पादन प्रकल्पांमध्ये गेल्या दहा वर्षात तब्बल 10 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे. सन 2017 साली जनरल मोटर्स या नामांकित कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता. त्यामुळे हा केवळ करोनामुळे बसलेला फटका होता असे पुर्णपणे मानता येत नाही. करोना यायच्या आधीच्या काळापासूनच या कंपन्यांना मंदीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला होता.
सप्टेंबर 2020 मध्ये हॅरले डेव्हीडसन या विदेशातील नामांकित कंपनीने आपला गाशा गुंडाळला आहे. मार्च 2019 मध्ये फियाट आणि मार्च 2018 मध्ये ईशर पोलॅरीस कंपनी भारत सोडून गेली आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये युएम मोटारसायकल ही कंपनीही भारत सोडून गेली आहे.
या कंपन्यांमध्ये अनेकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाले होते. त्या कंपन्यांच्या आधारावर अन्यही उद्योग जगत होते. पण या कंपन्यांच्या निर्णयामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. ऑटो उद्योगाबरोबरच सध्या वस्त्रोद्यागाचीही देशात मोठी कोंडी होत असून या क्षेत्रातील अनेक कारखानेही सध्या बंद पडत आहेत. या साऱ्या स्थितीवर मोदी सरकार काय उपाययोजना करणार याचे कोणतेच चित्र आज देशापुढे उभे नाही.