खटाव तालुक्‍यात 31 गावे, 93 वाड्या-वस्त्यांची तहान भागवली जातेय टॅंकरवर

दररोज 23 टॅंकरच्या 63 फेऱ्या 
प्रकाश राजेघाटगे

बुध – दुष्काळामुळे खटाव तालुक्‍यात टंचाईने हाहाकार माजवला आहे. तलाव, विहिरी पूर्ण कोरडे पडल्याने 31 गावे व 93 वाड्या वस्त्यांवरील 47 हजार 343 ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या गावांना 23 टॅंकर दररोज 63 खेपाद्वारे 7 लाख 94 हजार लिटर पाणी पुरवले जात आहे. एप्रिल अखेर व मे महिन्यात टॅंकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

खटाव तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत प्रशासनाला करावी लागत आहे. यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे लोकांबरोबर जनावरांच्याही पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने काही शेतकरी जनावरे कवडीमोल दराने विकत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतरासाठी पाठवत आहेत. मायणी विभागात धरणांसह तलाव, विहिरींतील पाणीसाठाही तळाला गेला आहे. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यावर मर्यादा आल्या आहेत.

स्रोत आटल्याने तालुक्‍यातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. तालुक्‍यातील टॅंकरने पाणी पुरवठा होत असलेली गावे अशी ः गारवडी, मोळ, मांजरवाडी, पाचवड, गारूडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, शिंगाडवाडी, विखळे, भांडेवाडी, नवलेवाडी, मुळीकवाडी, ढोकळवाडी, कलेढोण, नागाचे कुमठे, पेडगाव, अनफळे, एनकुळ, कानकात्रे, पडळ, रेवलकरवाडी, गुंडेवाडी, तडवळे, डांभेवाडी, मायणी, येलमरवाडी, निमसोड, मोराळे, कटगुण, धोंडेवाडी, थोरवेवाडी आदी गावांतून 47 हजार 343 बाधित लोकसंख्येला व 23 हजार 372 बाधित जनावरांना दररोज 7 लाख 94 हजार लिटर पाणी टॅंकरने पुरविण्यात येत आहे. याशिवाय 11 विहिरी व 21 विंधन विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. दिवसागणिक टॅंकर मागणी वाढतच चालली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.