कर्जत तालुक्‍यात बैल पोळा उत्साहात

सजवलेल्या बैलांची वाजत-गाजत काढली मिरवणूक

कर्जत  – तालुक्‍यात बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे सणावर दुष्काळाचे सावट होते. शेतकऱ्यांनी बैलांना सजवून पोळ्यानिमित्त त्यांची मिरवणूक काढत बैलपोळा साजरा केला. वर्षभर शेतात काम करणाऱ्या बैलांना बैलपोळ्याच्या दिवशी कामास जुंपत नाहीत व शेताचे कोणतेच काम करीत नाहीत.

सकाळी प्रथम बैलांना आंघोळ घालण्यात आली. नंतर हिंगूळ व बेगड, फुले, बाशिंग बांधून त्यांना सजवण्यात आले. सायंकाळी वाजतगाजत, ढोल ताशाच्या गजरात, फटाक्‍यांच्या आतषबाजीत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. बैल पुन्हा घरी आल्यावर सुवासिनींनी त्यांना ओवाळले व त्यांना पुरणाची पोळी खाण्यास दिली. बैलपोळ्याच्या दिवशी प्रथम आपल्या लाडक्‍या बैलांना जेवू घातल्यानंतर घरातील मंडळींनी जेवण केले.

ठिकठिकाणच्या गावातील प्रथेनुसार वेशीमध्ये सर्व परिसरातील बैल एकत्र आणण्यात आले. नंतर मानाच्या बैलांकडून नारळ फोडण्यात आले. त्यानंतर पोळा फुटला व मिरवणुका काढण्यात आल्या. विविध रंगांमध्ये सजवलेले खिलारी व इतर बैल पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जत परिसरामध्ये व तालुक्‍यात बैलांची संख्या कमी झालेली दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.