नारायण सातपुते
आटके जिल्हा परिषद शाळेत आगळा-वेगळा उपक्रम
वाठार – गत काही दिवसांपासून वाठारसह परिसरात पावसाची रिपरिप सुरुच आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठून राहिले आहे. अशाच शालेय आवारात साठलेल्या पाण्याचा चिकित्सक पध्दतीने शालेय अभ्यासक्रमात उपयोग करुन आटके, ता. कराड येथील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शाळेत पाऊस पाणी, दंगल गाणी असा आगळा-वेगळा स्तुत्य उपक्रम प्रभावीपणे राबविला.
या उपक्रमाचा पुरेपुर फायदा उठवत शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यात खेळण्यात आनंद घेतला. या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे. कराड तालुक्यातील आटके येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही सर्वात पहिली आयएसओ मानांकन प्राप्त झालेली शाळा आहे. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत नेहमीच विविध उल्लेखनीय उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते, मुलांच्या कलाने शालेय अभ्यासक्रम शिकविला तर तो अतिशय प्रभावीपणे विद्यार्थ्यांच्या गळी उरविता येतो, हे ओळखून येथील उपक्रमशील शिक्षक शशिकांत रासाटे यांनी इंग्रजी कविता रेन रेन कम अगेन, पावसा पावसा ये ये, येरे येरे पावसा अशी गीते शालेय आवारात पावसाच्या पाण्यात तालासुरात शिकविली. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृती करुन मनोरंजनातून शिक्षण पद्धतीने अतिशय परिणामकारक पाठ्यक्रम शिकविले जात आहेत. अशा कृतीयुक्त उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन होण्याबरोबरच अभ्यासही पूर्ण होतो.
पाऊस पाणी, दंगल गाणी या उपक्रमांतर्गत कागदी होडी, नाव तयार करुन पाण्यात सोडणे, पावसात गाण्याच्या तालावर नृत्य करणे असे विविध कार्यक्रम येथे घेतले जातात. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय उपस्थिती सुधारणे तसेच कृतीयुक्त अभ्यास, कला, कार्यानुभव परिणामकारक शिकविता येतात. एकंदरीतच या जिल्हा परिषद शाळेतील अशा विविध कृतीयुक्त उपक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. शाळेने राबविलेल्या या आगळ्या-वेगळ्या व कृतिशील उपक्रमांचे नागरिकांसह सर्वत्र कौतुक केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेची ही शाळा सदैव सज्ज आहे. 100 टक्के डिजिटल, प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर, संगीतमय परिपाठ, लेझीम, झांज पथक, ड्रेस कोडसह कवायत आदी उपक्रम शाळेत सुरु आहेत. ऋतुमानानुसार विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात.
शशिकांत रासाटे, मुख्याध्यापक