शाहू सृष्टीच्या रखडलेल्या कामावरून सभागृहात खडाजंगी

प्रलंबित कामांसाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक

शहरातील भीमसृष्टी, दिघी-मॅगझीन चौकातील संत नामदेव -ज्ञानदेव भेट शिल्प, शक्‍ती-शक्‍ती समूहाजवळचा लेसर शो व इतर अनुषंगिक अशी स्थापत्याविषयक कामांचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती महापौर जाधव यांनी सभागृहात दिली.

पिंपरी – केएसबी चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात उभारल्या जाणाऱ्या शाहुसृष्टीला होत असलेल्या विलंबावरील चर्चेत सभागृहात सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. शाहू महाराज जयंतीला शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार न घालू देण्याच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांच्या वक्‍तव्यावर सभागृह नेते एकनाथ पवार यांनी हरकत घेतली. शाहू महाराजांबद्दल सर्वांनाच आदर आहे, असे सांगत शाहू सृष्टीचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी जरूर प्रयत्न होतील. मात्र, तुम्ही विरोधी पक्षात असल्याचे भान ठेवा, अशा शब्दांत कदम यांना सभागृहातच खडे बोल सुनावत सत्ता भाजपची असल्याची प्रचिती आणून दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची तहकूब सभा गुरुवारी (दि.6) पार पडली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता. हा विषय सभागृहात चर्चेला आल्यानंतर मंगला कदम यांनी के.एस.बी. चौकातील शाहू महाराज पुतळ्याजवळच्या शाहूससृष्टीचे काम रखडल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या कामाची निविदा काढूनही हे काम चार वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे येत्या 26 जूनला असलेल्या शाहू जयंतीला महापौर राहुल जाधव यांच्यासह महापालिकेच्या एकाही पदाधिकाऱ्याला शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालू देणार नसल्याच्या आक्रमक पावित्रा त्यांनी घेतला. महापौर जाधव यांनी कदम यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्थापत्य विभागाच्या बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेत नसल्याचा आरोप करत, त्यांनी आयुक्‍तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मंगला कदम यांचे आरोप खोडून काढले. छत्रपती शाहू महाराज यांचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. त्यांना एका जिल्ह्यापुरते मर्यादीत ठेवू नका. मनासारखे न झाल्यास आयुक्‍त चुकीचे, अशा शब्दांत पवार यांनी आयुक्‍तांची बाजू सांभाळली. शाहू महाराजांना हार घालण्यावरून महापौरांना आव्हान द्यायचे, हे योग्य नाही. एखाद्या कामाचा डीपीआर, निविदा या बाबींना वेळ लागतो. शाहूसृष्टी ही शहरातील एक प्रेक्षणीय स्थळ व्हावे, नागरिकांनी त्याठिकाणी जावे, याकरिता प्रख्यात दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडून ते काम करुन घेण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती देत, पुढील शाहू जयंतीला हे काम पूर्ण होईल, असे आश्‍वासन दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.