क्रिकेट काॅर्नर : दुरुस्त आए मगर देर से!

– अमित डोंगरे

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत हिटमॅन रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, कर्णधार विराट कोहली यांनी अखेर जबाबदारीने फलंदाजी केली. त्याचे कौतुक आहेच, पण ही कामगिरी नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटीपासून व्हायला हवी होती. म्हणजेच भारतीय क्रिकेटपटू दुरुस्त आए मग देर से असेच म्हणावे लागेल.

आपल्या संघाचे हे पहिल्यापासून आहे की, परदेशात मालिका खेळताना पहिल्या दोन ते तीन सामने होईपर्यंत आपल्या फलंदाजांना काय किंवा गोलंदाजांना काय फॉर्मच सापडत नाही आणि मालिका अखेरच्या टप्प्यात आली की मग शतकी खेळ्या केल्या जातात. हे संघासाठी असते का स्वतःच्या संघातील स्थानासाठी हा संशोधनाचा विषय आहे. ही मालिका 1-1 अशा बरोबरीवर आहे आणि या सामन्यात भारतीय संघ ड्रायव्हर सीटवर आहे यात शंका नाही, पण तरीही धोका टळलेला नाही.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली खेळपट्टीवर रवींद्र जडेजासह उभा आहे. त्यानंतर भरात नसलेले अजिंक्‍य रहाणे व ऋषभ पंत फलंदाजीला येतील व जातील त्यामुळे आत्ता कोहली व जडेजावरच खरी मदार आहे. पहिल्या डावात शार्दुल ठाकूर खेळला म्हणजे तळाची फलंदाजी मजबूत झाली असे नाही. रहाणे व पंत खेळले तर तो बोनस ठरेल. या मालिकेत हीच डोकेदुखी भारतीय संघाच्या सोमर राहिलेली आहे. सलामीच्या फलंदाजांमध्ये सातत्य नाही, मधली फळी बेजबाबदार आहे तर तळाची फलंदाजीही बेभरवशाची आहे.

लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, कोहली, रहाणे, पंत, जडेजा ही बलाढ्य मानली जात असलेली फलंदाजी या मालिकेत अगदीच क्‍लब दर्जाची ठरली. एक जेम्स अँडरसन सोडला तर त्यांच्या गोलंदाजीत काहीही दम नव्हता मात्र, तरीही ते भारतीय फलंदाजांवर भारी ठरले याचे मुख्य कारण म्हणजे मुळातच कसोटी सामने खेळण्याची मानसिकता आता भारतीय संघात राहिलेली नाही. टी-20, आयपीएल व एकदिवसीय सामन्यांतच रमणारा संघ कसोटीत जीवावर आल्यासारखे खेळताना दिसत आहे.

चौथ्या कसोटीत शतकी खेळी केली किंवा पुजाराने वेगवान अर्धशतकी खेळी केली म्हणजे त्यांचे अपयश पुसून जाईल असे समजू नये. कारण त्यांनाच आलेल्या अपयशामुळेच ही मालिका या स्थितीवर येऊन थांबली आहे. अन्यथा ही फलंदाजी यशस्वी ठरली असती तर या कसोटीत भारतीय संघाने कधीच विजयी आघाडी घेतली असती. असो, जर तर या गोष्टींना क्रिकेटमध्येच नव्हे तर सर्वच क्षेत्रात महत्व नसते. त्यामुळे निदान आता या कसोटीसह पाचवी कसोटीही जिंकून मालिका जिंकावी हीच अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.