पहिल्या तीन टप्प्यांमध्ये कॉंग्रेस व मित्र पक्षांना मोठी आघाडी – चिदंबरम

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये जे मतदान झाले आहे त्यात कॉंग्रेस व मित्र पक्षांना एनडीएपेक्षा मोठी आघाडी मिळाली आहे असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. या तीन टप्प्यांमध्ये एकूण 303 मतदार संघांमध्ये मतदान झाले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या काल मुंबईत सभा झाली त्यात त्यांनी कॉंग्रेसला मोठ्या मुष्किलीने 50 जागा मिळू शकतील की नाही अशी शंका व्यक्त केली होती त्यावर प्रतिक्रीया देताना चिदंबरम यांनी हा दावा केला. ते आज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की मी या तीन टप्प्यांतील मतदानाची माहिती घेऊन हे विधान करीत आहे. या टप्प्यांमध्ये कॉंग्रेसने मोदींच्या विरोधात बरोबरीची कामगीरी केली आहे असा दावाही त्यांनी केला.

कॉंग्रेसने मित्र पक्षांच्या मदतीने या टप्प्यांमध्ये एनडीएवर मोठी आघाडी घेतली आहे. यात मोठी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे असा आत्मविश्‍वासपुर्ण दावाही त्यांनी केला. पण आता उर्वरीत टप्प्यात हाच लीड कायम ठेवणे हे काम अद्याप व्हायचे आहे त्याकडे आमचे लक्ष लागून राहिले आहे असे त्यांनी नमूद केले.

कॉंग्रेस 50 पेक्षा अधिक जागा मिळवू शकणार नाहीं असे मोदींचे भाकीत आहे त्यावर तुमचे म्हणणे काय असा प्रश्‍न विचारला असता चिदंबरम म्हणाले की लोकांना स्वप्न पहाण्यास कोणाची मनाई नाही. साधारणपणे लोकांना रात्री झोपल्यावर स्वप्न पडतात पण मोदी हे असे नेते आहेत की त्यांनी जागेपणीही स्वप्न पडत असावीत अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

मोदींच्या राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवरील दाव्यांचा समाचार घेताना ते म्हणाले की कॉंग्रेस राजवटीत देशाने शेजारील देशांशी तीन युद्धे करून देशाच्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेतली आहे. भारत आज पुर्ण सुरक्षित आहे कारण आपल्या देशाची तिन्ही सैन्य दले अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी निभावत असतात असे त्यांनी नमूद केले. लोकांनी मतपेटीतून नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीच्या विरोधात आपला राग व्यक्त केला आहे असेही त्यांनी नमूद केले. देशातील बेरोजगारीचा दर मागच्या 50 वर्षात नव्हता इतका वाढला आहे असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.