पूँछच्या जंगलातील मोहीम अंतिम टप्प्यात; पाकिस्तानी दहशतवादी ठार, 3 सुरक्षा जवान जखमी

जम्मू – जम्मू-काश्‍मीरच्या पूँछ जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांनी 14 दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेवेळी रविवारी दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये अटकेत असलेला पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला. तर, तीन सुरक्षा जवान जखमी झाले. दरम्यान, सुरक्षा दलांची मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहचल्याचे संकेत मिळत आहेत.

लष्कर आणि पोलिसांनी 11 ऑक्‍टोबरपासून दहशतवाद्यांच्या विरोधातील संयुक्त मोहीम सुरू केली. जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा शोधण्यात मदत व्हावी या उद्देशातून आधीच अटकेत असलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला सुरक्षा पथकांनी आपल्याबरोबर घेतले. ताज्या चकमकीत गंभीर जखमी होऊन तो मृत्युमुखी पडला.

त्याशिवाय, एक लष्करी जवान आणि दोन पोलीस जखमी झाले. सुरक्षा पथकांनी आता जंगलातील अतिशय कमी भागात दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यामुळे पंधरवड्यापासून सुरू असणारी मोहीम लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता बळावली आहे.

त्या मोहिमेत आतापर्यंत लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले. मोहिमेत सहभागी सुरक्षा पथकांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर्स आणि ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत. त्या मोहिमेवर वरिष्ठ पातळीवरून देखरेख ठेवली जात आहे.

…………..

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.