मासुळकर कॉलनीतील नेत्र रूग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी – मासुळकर कॉलनी येथील नागरी आरोग्य केंद्र, नेत्र रूग्णालय आणि निवासी डॉक्‍टरांच्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात नेत्र शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मासुळकर कॉलनी येथे 10 ऑक्‍टोंबर 2016 मध्ये रुग्णालयाच्या कामाला सुरवात झाली. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने त्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कामासाठी एकूण 25 कोटी 78 लाख रुपये इतका खर्च मंजूर आहे. तळमजला आणि पहिला व दुसरा मजला अशी रुग्णालय इमारत उभारण्यात आली आहे. त्याचे बांधकाम क्षेत्र 5 हजार 52 चौरस मीटर इतके आहे. शहरामध्ये सध्या महापालिकेचे नेत्र रूग्णालय नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी रूग्णालयांमध्ये नेत्र शस्त्रक्रिया करावी लागते. मासुळकर कॉलनीत नेत्र रूग्णालय सुरू झाल्यानंतर ही गैरसोय दूर होऊ शकणार आहे.

नेत्र रूग्णालयाची रचना

तळमजला : नागरी आरोग्य केंद्र बाह्यरूग्ण विभाग, 6 तपासणी व 2 उपचार कक्ष, नेत्र रूग्णालय – बाह्य रूग्ण विभाग : 4 तपासणी खोल्या व 2 उपचार कक्ष.
(सुविधा : तपासणी, प्रशस्त प्रतीक्षागृह, आपत्कालिन सेवा, उपचार गृह, फार्मसी, फिजिओथेरपी, “क्ष’ किरण तपासणी, अल्ट्रासोनोग्राफी, ई.सी.जी. व चष्म्याचे दुकान.)
पहिला मजला : नेत्र शस्त्रक्रिया (3 शस्त्रक्रिया कक्ष) विभाग, डे केअर वॉर्ड, रक्‍तसाठा कक्ष, अद्ययावत पॅथॉलॉजी प्रयोगशाळा व प्रशासन विभाग, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग.
दुसरा मजला : अद्ययावत प्रसूतीगृह व नवजात शिशुंचा अतिदक्षता विभाग (प्रसुती विभाग – 20 खाटा, नेत्ररूग्ण विभाग – 12 खाटा), निवासी वैद्यकीय अधिकारी निवास – 3.

रूग्णालय इमारतीचे स्थापत्य आणि विद्युतविषयक काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

– संजय घुबे, कार्यकारी अभियंता, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)