घरच्या आहेराने सत्ताधारी अडचणीत

धुसपूस चव्हाट्यावर ः पक्षनेत्यांकडून सारवासारवीचा प्रयत्न
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला आपल्याच पक्षातील नाराज नगरसेवकांची नाराजी दूर करता येत नसल्याने आतापर्यंत अनेकदा स्वकीयांकडूनच मिळणाऱ्या घरच्या आहेराने “पार्टी वुईथ डिफरन्स’ असलेला भाजप हैराण झाला आहे. नगरसेवकांनी तोफ डागल्यानंतर त्यांच्या अडचणी समजावून घेतो, त्यांचीशी चर्चा करतो, अशी उत्तरे देत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या नाकीनऊ येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अनधिकृत नळजोड वाढले आहेत. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरु आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप करत महापौरपदासाठी डावलेले भाजपचे निष्ठावान नगरसेवक नामदेव ढाके यांनी महासभेत प्रशासनाचा निषेध केला.

ढाके बोलत असताना महापौर राहुल जाधव यांनी त्यांना बोलण्यापासून थांबविले. ढाके यांच्या भाषणाचा सभावृृत्तांतामध्ये समावेश करुन नये, अशी सूचना केली. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न प्रशासन गांभिर्याने घेत नाही. प्रशासनाला नागरिकांच्या प्रश्‍नांची जाण नाही. नाले बुजविले आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहराची वाट लागली आहे. हॉकर्स झोन निश्‍चित केले जात नाहीत. नदीत जलपर्णी साचली आहे. शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात काय चालले हेच कळत नाही, असा आरोप उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी केला. तर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचा प्रशासनावर वचक नाही. आयुक्‍त निष्क्रिय आहेत. त्यांनी स्थळ पाहणी केल्यानंतरही त्या समस्या सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा तसेच आपल्याच पक्षाला घराचा आहेर देत पाटी मीटिंगमध्ये बोलू दिले जात नसल्याचा खळबळजनक आरोप नगरसेविका माया बारणे यांनी केला.

दरम्यान, या बाबतीत सत्तारूढ पक्षनेते यांना विचारले असता, पार्टी मिटींगमध्ये प्रत्येक नगरसेवकाला बोलण्याची संधी दिली जाते. त्यामुळे माया बारणे यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नाही, असे ते म्हणाले. तसेच थेट प्रसारमाध्यमांशी चर्चा करण्याऐवजी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यास, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ती समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

दत्ता सानेंचे आरोप सवंग प्रसिद्धीसाठी

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केलेल्या आरोपांबाबत पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, साने यांनी आतापर्यंत केलेला एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. केवळ सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठीच ते असले आरोप करत आहेत. आतापर्यंत केलेल्या आरोपांपैकी एक जरी आरोप ते सिद्ध करू शकले असते, तरी आम्ही त्यांची आरोप करण्यामागील भूमिका समजू शकलो असतो. मात्र त्यांचे आरोप केवळ आणि केवळ सवंग लोकप्रियतेसाठीच आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here