म्हाडाच्या घरकूल योजनेच्या नरक यातना संपेनात

हक्‍काची घरे मिळूनही राहणीमान सुविधांच्या अभावामुळे झोपडपट्टीप्रमाणेच

दैनिक प्रभातने उठवला होता आवाज

सदर बझार येथील नागरिकांचे हे हाल सुरू आहेत त्याला प्रभातने वेळोवेळी सचित्र प्रसिद्धी दिली आहे. पालिका प्रशासन व बीव्हीजी या दोघांनी हात झटकल्याने लाभार्थींची घरे कोंडवाडा बनली आहेत. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या वारंवार अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी पालिकेत कधीच उपलब्ध नसतात. ते कुठे जातात, काय करतात, कोणालाच सांगून जात नाही त्यामुळे दैनंदिन कामाचा खोळंबा होतो. अगदी स्थायी समितीतसुध्दा एखादा विषय रिटेंडरिंगला आल्यावर त्यांच्यावर खडाजंगी होते मग मला त्याची माहिती मिळते असा थेट बॉम्ब नगराध्यक्षांनी टाकल्याने पालिका अवाक झाली होती. अजूनही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे सूर जुळलेले नाही. तरीही माधवी कदम यांनी आंबेडकर नगर वसाहतीचा दौरा करूनही या वसाहतीतील लोकांच्या राहणीमानात फरक पडलेला नाही.

सातारा – बीव्हीजीने केलेल्या घरकूल योजनेच्या राजकीय मतभेदाची भांडी पुन्हा वाजू लागली आहेत. वारंवार निवेदने देऊन व लेखी तक्रारी करूनही सातारा पालिकेचा कुंभकर्णी पवित्रा व बीव्हीजीने हात वर केल्याने म्हाडाच्या लाभार्थी घरकूल धारकांना हक्काची घरे मिळूनही राहणीमान सुविधांच्या अभावामुळे झोपडपट्टीवासियांप्रमाणे बनले आहे. घरांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पातळीचे आहे. नागरिकांना दिलेल्या सुविधा व्यवस्थित नसून त्याचा नागरिकांना आता त्रास होऊ लागला आहे. या असुविधाचा संताप व्यक्त करण्यासाठी येथील रहिवाशी महिलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नुसत्या जुजबी चर्चा आणि उपाययोजनांना जितके लाभार्थी वैतागलेत त्यापेक्षा अधिक वैताग येथील भुरट्या चोरट्यांनी दिला आहे. कधी खिडक्‍यांचे लोखंडी ग्रिल, लाकडी चौकटी दरवाजे टाईल्स, कुलुपे यांची राजरोसपणे चोरी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तुटलेली शौचालयाची भांडी, तुंबलेली गटारे, गळके सिलिंग, अस्वच्छ पाण्याच्या टाक्‍या अशा दुर्गंधयुक्त परिसरात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

ड्रेनेजच्या पाईपलाइनचे पाणी सर्वत्र पसरत आहे, तेच जंतू पाण्यात जात असून तेच पाणी नागरिक वापरात आहेत, दूषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका आणि निर्माण होण्याची शक्‍यता झाली आहे. घरकूल योजनेतल्या 228 घरांना पालिकेचे नळ कनेक्‍शन असून त्यांना प्राधिकरणातर्फ पाणीपुरवठा केला जातो. मात्र सांडपाणी व ड्रेनेजच्या पाण्याला स्वतंत्र आउटलेट नसल्याने स्वच्छ पाणी दूषित होण्याची परिस्थिती आहे. ठेकेदार कंपनी बीव्हीजी व पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी थेट पालिकेवर मोर्चा काढून नगराध्यक्ष माधवी कदम यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली होती. त्या घटनेला तीन महिने उलटले पण सुविधा तर सोडाच भुरट्या चोऱ्यांनी लाभार्थी वैतागले. वॉर्डातील नगरसेवक भागात फिरत नसल्याची तक्रार झाली.

मुख्याधिकारी शंकर गोरे व बांधकाम विभागाचे अभियंता भाऊसाहेब पाटील उपस्थित नसल्याने महिलांच्या कोणत्याच प्रश्‍नाला नगराध्यक्ष उत्तर देऊ शकल्या नाहीत. तरी सुध्दा माधवी कदम यांनी महिलांची समजूत घातली आणि बुधवारी दुपारी थेट स्पॉट व्हिजिट करू असे महिलांना स्पष्ट आश्‍वासन दिले. बीव्हीजी कंपनीने घरकुलाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप नागरिकांनी केला. निकृष्ट सिलिंग पाझरणाऱ्या भिंती दरवाजे आणि खिडक्‍यांचा खराब दर्जा पाणीपुरवठ्याची अनियमितता यामुळे प्रचंड त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.