जिल्ह्यात आज प्रचाराची सांगता

सायंकाळी पाचपर्यंत गावोगावांत प्रचार फेऱ्या, भेटीगाठी, सभा, रोड शो रंगणार


आज आणि उद्याची रात्र वैऱ्याची : …तर आचारसंहिता भंगाची कारवाई

पुणे – एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप, टीकेचा भडिमार, शाब्दिक हल्ले, पदयात्रा आणि सभा… अशी प्रचाराची उडवलेली राळ शनिवारी (दि. 19) संपणार आहे. जाहीर प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी पाचनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यामुळे शनिवारी गावोगावांत प्रचार फेऱ्या, भेटीगाठी, प्रचारकांच्या सभा व रोड शो यांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेली 15 दिवस सुरू असलेला विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा गदारोळ शनिवारी सायंकाळी पाचनंतर थंडावेल. समारोपासाठी प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आयोजित केल्या आहेत. त्यानंतरचा सोमवारी मतदानापर्यंतचा कालावधी निवडणूक रिंगणातील उमेदवार त्यांच्या यंत्रणेसाठी “जागते रहो’चा ठरणार आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त प्रचार करण्यावर सर्व पक्ष-आघाड्यांसह अपक्षांनी भर दिला. त्यामुळे प्रचारसभा, पदयात्रांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालेले आहे. शेवटच्या दिवशीही राजकीय पक्षांनी पदयात्रा, रॅलीवर भर दिला जाणार आहे. सायंकाळी पाचवाजेपर्यंत उमेदवार, राजकीय पक्षांना हा प्रचार करता येणार नसून नंतर प्रचारतोफा पूर्णपणे थंडावणार आहेत. त्यानंतर प्रचाराच्या काळात उमेदवार व पक्षांनी विविध ठिकाणी लावलेले बॅनर, पोस्टर, ध्वज, फलक काढून घेणे आवश्‍यक आहे. हे साहित्य काढून घेण्याची जबाबदारी त्याची परवानगी घेणाऱ्यांवर राहणार आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे उमेदवार किंवा राजकीय पक्षांना मतदारांना आवाहन करणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत; अन्यथा निवडणूक यंत्रणेकडून संबंधित उमेदवारांवर आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यातील 97 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मशीन बंद
जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात एकूण 97 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचा गेले 15 दिवस जोरदार प्रचार सुरू आहे. शनिवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा धुराळा शांत होणार आहे. तर शनिवारी सायंकाळी पाचनंतर कार्यकर्त्यांकडून रविवारी (दि. 20) दिवसभर छुपा प्रचार रंगणार आहे. तर सोमवारी (दि. 21) मतदारराजाचा दिवस असून सकाळी 7 वाजता मतदान सुरू होणार असून ते 6 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील 97 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यातील दहाही मतदारसंघातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे; बारामती : 10, दौंड : 11, इंदापूर : 15, पुरंदर-हवेली : 11, भोर : 7, खेड-आळंदी : 9, जुन्नर : 11, शिरूर-हवेली : 10, आंबेगाव-शिरूर : 6, मावळ : 7.

“काटे की टक्‍कर’ मतदारसंघनिहाय उमेदवारांचे नाव (पक्ष)
बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी)-गोपीचंद पडळकर (भाजप). खेड-आळंदी : दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी)-आमदार सुरेश गोरे (शिवसेना)-अतुल देशमुख (अपक्ष). आंबेगाव-शिरूर : दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)-राजाराम बाणखेले (शिवसेना). दौंड : रमेश थोरात (राष्ट्रवादी)-आमदार राहुल कुल (भाजप). इंदापूर : आमदार दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)-हर्षवर्धन पाटील (भाजप). शिरूर-हवेली : अशोक पवार (राष्ट्रवादी)- आमदार बाबुराव पाचर्णे (भाजप). जुन्नर : अतुल बेनके (राष्ट्रवादी)-आमदार शरद सोनवणे (शिवसेना)-आशा बुचके (अपक्ष). भोर : आमदार संग्राम थोपटे (कॉंग्रेस)-कुलदीप कोंडे (शिवसेना). पुरंदर-हवेली : संजय जगताप (कॉंग्रेस)- राज्यमंत्री विजय शिवतारे (शिवसेना). मावळ : सुनील शेळके (राष्ट्रवादी)-आमदार बाळा भेगडे (भाजप).

Leave A Reply

Your email address will not be published.