16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश
रावणगाव – खडकी (ता. दौंड) येथील एक रहिवासी लष्कराचा (आर्मी) अधिकारी असल्याची बतावणी करत असल्याचे लक्षात आल्याने या इसमाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार (दि. 10) सापळा रचून ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला आज गुरुवार (दि. 11) दौंड येथील न्यायालयात हजर केले असता 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्यास दौंड येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील खडकी गावाच्या हद्दीत प्रशांत विजय काळे (वय 27, रा. खडकी) ही व्यक्ती भारतीय लष्करात कोणत्याही पदावर नेमणुकीस नसतानाही 14 सिख रेजिमेंटचा मेजर असल्याची बतावणी करीत असल्याचे समजले. त्याबाबत खातरजमा करण्याकरीता पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार रौफ इनामदार, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, नीलेश कदम, महेश गायकवाड, रविराज कोकरे, अनिल काळे, पोलीस नायक गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने खडकी येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावरून अंगात इंडियन आर्मी लोगो असलेला खाकी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या प्रशांत विजय काळे ऊर्फ रोबोस्ट आण्णा यास ताब्यात घेतले. संबंधित इसमाची कसून चौकशी केली असता त्याने स्वतः लोकसेवक असल्याची बतावणी केल्याचे लक्षात आले.
याबरोबरच त्याच्या खडकीतील काळेवाडा येथील घरातून भारतीय सेना दलाचे नियुक्ती पत्र, सेना दलात विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दिली जाणारी पदके, सन्मानचिन्ह, लोगो, भारतीय सेना दलाची कपडे, मोबाइल फोन असा एकूण 9 हजार 500 किमतीचा माल हस्तगत केला आहे. त्याच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सचिन मोहन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.