आगामी काळात “न्यू फलटण’मधून सोन्याचा धूर निघेल

विद्वांस शामसुंदर शास्त्री; न्यू फलटण शुगर वर्क्‍सचा मोळीपूजन कार्यक्रम उत्साहात

फलटण – आपल्या राज्यातील बहुतांश साखर कारखाने राजकारणी मंडळी चालवत असतात. परंतु, कंपनीचे संस्थापक प्रेमजी रुपारेल अत्यंत धार्मिक असून आगामी काळात “दत्त इंडिया’च्या माध्यमातून साखरवाडीच्या न्यू फलटण शुगर वर्क्‍स या कारखान्यातून सोन्याचा धूर नक्कीच निघेल, असा विश्‍वास विध्वंस शामसुंदर शास्त्री यांनी साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍स या कंपनीच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमावेळी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र सहकारी बॅंकेचे संचालक अविनाश महागावकर, महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डी.के. पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण पंचायत समितीचे सभापती प्रतिभाताई धुमाळ यांच्यासह पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “1933 पासून तालुक्‍याने व या कारखान्याने गळीत हंगाम पाहिले आहेत. कारखाना सुरू ठेवण्यासाठी आगामी काळात आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे सहकार्य महत्वाचे आहे. न्यू फलटण शुगरमुळेच साखरवाडी गावाची ओळख राज्यात आहे. काही कारणामुळे तालुक्‍यातील काही संस्था अडचणीत आल्या.

थोडा संयम ठेवून आपण सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने “एनसीएलटी’मध्ये दाद मागितली व शेतकऱ्यांची देणी सप्लायर या कॅटेगरीमध्ये न घेण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले नाहीत, त्यांना पण थकीत बिले मिळणार आहेत. परंतु, त्यांनी आता अर्ज भरणे गरजेचे आहे.” निवडणुकीच्या वेळेस आपण राजकारण करू. परंतु, संस्थांमध्ये राजकारण नको, असे आवाहन संजीवराजे निंबाळकर यांनी केले.

यावेळी “दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांनी कंपनीची माहिती दिली. त्यानुसार दत्त इंडिया कंपनी आज साखर ट्रेडिंगमध्ये व इतर उद्योग पाहताना दोन हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत आहे. आपल्या देशांमधून निर्यात होणाऱ्या साखरेपैकी दत्त इंडिया कंपनी 25 टक्के साखर निर्यात करते. निर्यातीमध्ये सिंगापूर, दुबई, नेदरलॅंड, श्रीलंका या देशांमध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केली जाते.

तसेच आपल्या देशांमधील ब्रिटानिया, पार्ले या नामांकित कंपनीला दत्त इंडिया ही कंपनी साखर सप्लाय करते. ही कंपनी साखर व्यवसायाबरोबरच दूध डेअरीमध्ये कार्यरत असून हमिदवाडा (जि. कोल्हापूर) येथे दूध डेअरी डिलिशिया या नावाने एक लाख लिटर प्रति दिवस संकलन करते व त्या दुधापासून दहा मेट्रिक टन दूध पावडर प्रकल्प कंपनीने उभारला आहे.

एनसीएलटीच्या आदेशाप्रमाणे न्यू फलटणच्या शेतकऱ्यांची मंजूर झालेली अंदाजे रक्कम 25 ते 26 कोटी असून त्यापैकी प्रथम दहा कोटी 60 लाख इतकी रक्कम आगामी तीन महिन्यांत शेतकऱ्यांना देण्याचे कंपनीने आश्‍वासन दिले आहे. उर्वरित अंदाजे 15 कोटी पुढील बारा महिन्यात देणेबाबत एनसीएलटी कोर्टाने आदेश
दिलेले आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. आजपासून दोन दिवसांमध्ये 20 कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. उर्वरित रक्कम हंगाम बंद होण्यापूर्वी बॅंक खात्यावर वर्ग करत असल्याचे आश्‍वासन शिंदे यांनी दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)