शहरात 41 किलो गांजा जप्त

निगडी, भोसरी पोलिसांची कामगिरी ः एका महिलेसह चौघांना अटक

पिंपरी – पोलिसांनी दोन ठिकाणी छापा मारुन तब्बल 41 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी निगडी आणि भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. राहुल भीमराव पवार (वय-21), संगीता भीमराव पवार (वय-40) अरुण बळीराम जाधव (वय-28, सर्व रा. अण्णा भाऊ साठे वसाहत, ओटास्कीम, निगडी) , उत्तरेश्‍वर ऊर्फ बॉक्‍सर दगडू कांबळे (वय 54, रा. गुळवे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास आरोपींकडे अमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घातला असता त्यांना 10 किलो 500 ग्रॅम वजनाचा दोन लाख 10 हजार रुपये किंमतीचा गांजा मिळून आला. यामध्ये राहुल, संगीता, अरूण यांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत भोसरी पोलिसांनी उत्तरेश्‍वर ऊर्फ बॉक्‍सर दगडू कांबळे (वय 54, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास भोसरी पोलीस परिसरात गस्त घालत होते. दरम्यान भोसरी गावठाण स्मशान भूमी रोड येथील शंकर मंदिराच्या मागील बाजूस एक मोटार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे दिसून आले. पोलीस त्या मोटारीजवळ गेले असता, त्यातील एकाने पोलीस आल्याचे पाहताच पलायन केले. एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता, त्यामध्ये 30 किलो 435 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. एकूण चार लाख 47 हजार 394 रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पाच लाख 60 हजार रुपये किमतीची मोटार असून एकूण दहा लाख 7 हजार 394 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, कर्मचारी गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, सागर भोसले, बाळासाहेब विधाते या पथकाने कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.