वाई शहरात “मुळशी पॅटर्न’चा थरार

अनिल काटे
युकवाच्या डोक्‍यात फरशी फोडल्याच्या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावर निर्माण झाले आहे. दरम्यान, वाई बसस्थानकातही परिसरातील गावांमधील युवकांचे वारंवार तंटे होत असतात. अनेकदा या भांडणांमध्ये धारदार शस्त्रांचा वापर करुन एकमेकांना गंभीर करण्याच्या घटना घडतात. परंतु, त्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने दिवसेंदिवस इतिहासिक वाई शहरातील शांतता भंग होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वाई बसस्थानकात परिसरातीलच दोन गावांमधील युवकांचा जोरदार राडा झाला होता. त्यानंतर राडा करणाऱ्या युवकांच्या एका गटाने “काशिनाथाचं चांगभलं’चा जयघोष करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर काशिनाथाची ही गर्जना कुणाचीतरी काशी करु नये म्हणजे झालं? अशा प्रश्‍नार्थक प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटल्या होत्या. (विशेष म्हणजे बसस्थानकात असे हाणामारीचे प्रकार वारंवार घडत असतात.) या प्रकारानंतर पोलिसांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र तसे काही झाले नाही. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास वाई शहरात पुन्हा हाणामारीचा प्रकार झालाच. तीन-चार युवकांनी एका युवकाला टार्गेट करत थेट डोक्‍यात फरशी घालून संबंधित युवकाला जखमी केले. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवसाढवळ्या युवकांची सिनेस्टाईल राडेबाजी वारंवार घडू लागली आहे. त्यातच नुकताच काही महिन्यांपूर्वी मुळशी पॅटर्न हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटातही अशाच प्रकारची राडेबाजी दाखविण्यात आली आहे. काल झालेल्या घटनेमुळे वाईकरांना मुळशी पॅटर्नचाच थरार अनुभवयास मिळाला आहे.

गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ
कदाचित पोलिसांच्या निष्क्रीय कारभारामुळे वाईकर नागरिकांना आठवडी बाजारात होणाऱ्या चोरीच्या घटनांची सवय झाली आहे, असे म्हटले तर वावग ठरणार नाही. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शहरात हाणामाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. युवकांच्या दोन गटांमध्ये होणारे वाद एकमेकांवर शस्त्रे चालवण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. चोऱ्या, हाणामाऱ्या, मुलींची छेडछाड या वाढत चाललेल्या घटनांमुळे एकंदरीत वाई शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच झाल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे.

पोलिसांना नाही सोयीरसुतक
किसनवीर महाविद्यालय व वाई एसटी आवारात रोज घडणाऱ्या युवकांच्या हाणामारीचा “मुळशी पॅंटर्न” संपूर्ण वाई तालुक्‍याबरोबरच आता भर बाजारात घडू लागला आहे. हातात कोयते घेवून हल्ला करणाऱ्या युवकांना पाहून शहरातील नागरिकांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. शुल्लक कारणास्तव काही तरुणांचे टोळकं जीवघेणा हल्ला करून पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार होत आहेत. मात्र याचे पोलिसांनाही कसलंही सोयरसुतक वाटत नसल्याचेच दिसून येत आहे.

कायद्यानेच कायद्या वेशीला टांगल म्हणण्याची वेळ
गुन्हेगारांना वाई पोलिसांची भीती नसल्यामुळे दर सोमवारी मोबाईल चोऱ्या, पाकिटमारी, चैन स्केचिंग, घर व दुकानफोड्या करून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला तरी पोलिसांना सुगावा लागत नाही तर खून व जबरी मारणाऱ्या करणारे आरोपी पोलिसांच्या हाताला लागत नाहीत दुसरीकडे मात्र वडाप, मटका, दारू, गांजाचा धंदा तेजीत सुरू असल्याने कायद्यानेच कायद्याला वेशीला टांगल म्हणायची वेळ वाईकरांवर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.