पुसेसावळी – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पुसेसावळी (ता. खटाव) शाखेतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे एक कोटी 65 लाख 96 हजार 159 रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील दत्त चौकापासून 50 मीटर अंतरावर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा आहे. या शाखेत रविवारी पहाटे चारच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी शाखेच्या इमारतीची व्यवस्थित माहिती घेऊन चोरी केल्याचे निदर्शनास येत आहे. शाखेच्या आजूबाजूचा परिसर निर्जनस्थळासारखा आहे.
सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी वावर कमी असतो. शाखेच्या पश्चिमेकडे एसटी महामंडळाची पडीक जागा असून दक्षिणेस बंद पडलेले सिनेमागृह आणि पूर्वेस शाखेच्या प्रवेशद्वारात दुकाने आहेत. त्यामुळे बॅंकेची शाखा कोठे आहे, हे शोधावे लागते. बॅंकेला शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी बॅंकेच्या पश्चिमेकडीललोखंडी ग्रील कटरच्या साह्याने कापले. त्यानंतर आतील दरवाजा उघडला आणि आत सुरू असलेल्या विजेच्या बल्बवर कापड टाकले. शाखेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून त्यांनी स्ट्रॉंग रूममध्ये प्रवेश केला.
स्ट्रॉंग रूममधील लोखंडी तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील एक कोटी 18 लाख 45 हजार 540 रुपयांचे सोने आणि 47 लाख 50 हजार 619 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. कर्मचाऱ्यांनी आज सकाळी बॅंक उघडल्यावर चोरी झाल्याचे समजले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी, औंधचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी सकाळपासूनच बॅंकेतील घटनाक्रमावर लक्ष ठेवून तपासासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी साताऱ्याहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वानाने राजाचे कुर्लेच्या दिशेला रस्त्यलगतच माग काढला आणि ते तेथेच घुटमळले. पोलिसांनी बॅंकेतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. चोरी झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरताच बॅंकेत वैयक्तिक लॉकर असलेल्या ग्राहकांनी बॅंकेकडे धाव घेतली. भीतीने त्यांची गाळण उडाली होती. या प्रकरणी सपोनि उत्तम भापकर तपास करत आहेत.