भाजपमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरु

चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, रणजीत पाटील यांच्या नावाची चर्चा

मुंबई- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर महाराष्ट्रात भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. दानवेंच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शोधाशोध सुरु झाली असून याबाबत लवकरच पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख आणि रणजित पाटील या तीन मराठा समाजाचे असलेल्या मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत.

रावसाहेब दानवे पाचव्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. 2014 मध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी केंद्रात भाजपाची सत्ता होती. मोदींच्या सरकारमध्ये दानवे हे राज्यमंत्री होते. मार्च 2015 मध्ये त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे त्यांच्या हातात सोपविण्यात आली होती. आता पुन्हा एकदा देशात भाजपाचे बहुमताचे सरकार आले आहे. गुरूवारी मोदींच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने एक व्यक्ति एक पद या तत्वानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भाजपाने नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या शर्यतीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याबरोबरच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नेमणूक करायची याबात भाजपाचे केंद्रिय नेतृत्व राज्यातील कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेण्याची शक्‍यता असल्याची माहिती भाजपाच्या एका नेत्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.