कराड -कराड तालुक्यात करोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे. हे बाधित तालुक्यातील असलेतरी कराड शहरातील नागरिकांचा त्यांच्याशी या ना त्या कारणाने संपर्क येत असतो. त्यामुळे बाधित खेड्यात तर धास्ती मात्र कराड शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या बाधितांची नोंद कराड अशीच होत असल्याने शहरातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची त्यांना शोधण्यासाठी धावाधाव होताना दिसत आहे.
गत दोन महिन्यापूर्वी मंगळवार पेठेतील एक महिला करोना बाधित आढळून आली होती. स्व. सौ. वेणूताई चव्हाण रूग्णालयातील बाधितांच्या संपर्कात आल्याने संबंधित महिला बाधित झाली होती. उपजिल्हा रूग्णालयातील संबधित बाधित हे ग्रामीण भागातील राहणारे होते. मात्र, त्यांचा कराडशी दररोजचा संपर्क होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, यावेळी त्या बाधितांसह मंगळवार पेठेतील महिलाही करोनामुक्त झाल्याने नागरिकांनी नि:श्वास सोडला. त्यानंतर दोन महिन्यात शहरात एकही रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला नव्हता.
शासनाने पाचव्या टप्प्यात शिथीलता दिल्याने तालुक्यातील अनेक गावातील लोकांची शहरात वर्दळ वाढली. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी अशा सूचना केल्या जात होत्या. त्यातच गत पंधरा दिवसांपूर्वी बैलबाजार रोडवरील झोपडपट्टी मधील एक 75 वर्षीय वृद्ध करोना बाधित आढळून आला. मात्र, त्याला सातारा येथे विवाहास गेल्यानंतर प्रादुर्भाव झाला होता. तो कराडात राहत असल्याने तसेच हा झोपडपट्टी एरिया असल्याने नागरिकांमधील भिती पुन्हा वाढली.
मात्र, संबंधित व्यक्तीच्या कुटूंबातील पाच व्यक्ती वगळता अन्य एकही व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून न आल्याने नागरिकांमधील भिती कमी झाली. मात्र, कराड शहरातील बाधितांची संख्या सहा इतकी झाली होती. याच कालावधीत रूक्मिणी विहारमधील ठाणे येथे एसटी डेपोत कामास असणारी एक व्यक्ती एक रात्री घरी आली होती. दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्ती क्वारंटाईन झाल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या कुटूंबियामधील एकही व्यक्ती पॉझिटीव्ह न आल्याने कराडकरांची काळजी मिटली.
चार दिवसांपूर्वी सोमवार पेठेतील एक व्यक्ती पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दुपारपर्यंत नागरिकांमधून भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, तीही व्यक्ती मुंबईहून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून तिचा शहरातील नागरिकांशी संबंध नाही असे कळताच नागरिकांमधील भिती कमी झाली.
हे कमी होते की काय गुरूवारी सकाळी बनवडी येथील सात बाधितांमध्ये कराडमधील काहींचा समावेश आहे. ते मंगळवार पेठेतील रहिवाशी असून चार दिवसांपूर्वी बनवडी येथे गेल्या होता. त्यांच्या अहवालाने पुन्हा एकदा कराडकरांची धास्ती वाढली आहे. ही साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असले तरी त्यांचा शहरातील आणखी किती लोकांशी संपर्क आला असेल याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
दरम्यान, तालुक्यातील सापडत असलेल्या बाधितांचा कराड असाच उल्लेख केला जात असल्याने प्रशासनाची मात्र, रोजचीच धावाधाव सुरू असते.
पंचायत समितीतील कर्मचारी पॉझिटिव्ह
कराड येथील पंचायत समितीमधील एक कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याने पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पंचायत समितीकडून संपूर्ण इमारत सॅनिटाईज करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती दि. 29 रोजी पुणे येथे गेली होती. तेथून ते दि. 30 रोजी कराड येथे आले होते. आल्यानंतर त्याच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता.
एक दिवस पंचायत समितीत येऊन रजा टाकून ते स्वत: होम क्वारंटाइन झाले होते. बुधवारी सायंकाळी त्यांचा अहवाला पॉझिटीव्ह आला. पंचायत समितीमधील एक महिला कर्मचारीही आजार असल्याने चार दिवस रजेवर आहेत. संबंधित कर्मचारी कोणाच्या संपर्कात आले होते का याचा शोध सुरू आहे. मात्र, पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहेत.