मुंबई – उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींमधील सगळ्यात विश्वासार्ह, प्रतिष्ठित आणि आदर असणारा चेहरा म्हणून अमिताभ बच्चन यांचे स्थान सगळ्यात अव्वल असल्याचे दिसून आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यमून ब्रँडसने (आयआयएचबी) प्रथमच अशा प्रकारचा अभ्यास केला असून त्यामध्ये जाहिरातींमधील सर्वात स्टायलिश चेहरा म्हणून क्रिकेटपटून विराट कोहलीचे नाव पुढे आले आहे.
सेलिब्रिटीची विश्वासार्हता (ट्रस्ट), ओळख (आयडेंटिफिकेशन), आकर्षकपणा (अॅट्रॅक्टिव्हनेस), आदर (रिस्पेक्ट) आणि आपलेपणा (अपील) यावर आधारित या अभ्यासाला टीयारा (टीआयएआरए) म्हणून ओळखला जाते. त्यातून सेलिब्रिटीजचा मानांकन अहवाल तयार करण्यात येतो. आयआयएचबीने केलेल्या अशा प्रकारच्या अभ्यासात देशभरातील 23 शहरांमधील 60 हजार लोकांकडून प्रतिसाद मागवण्यात आला होता.
या अभ्यासात 78 वर्षांचे अमिताभ बच्चन या सगळ्या निकषांमध्ये अव्वल ठरत असल्याचे दिसून आले आहे. अतिशय सभ्य, सदाबहार आणि हसतमुख अमिताभ यांनी या शर्यतीत त्यांच्याहून 50 वर्षांनी लहान असणाऱ्या अनेक अभिनेत्यांवर आणि क्रीडापटूंवर मात केलेली दिसते. बच्चन यांना कौन बनेगा करोडपती या शोमध्ये यश मिळाल्यानंतर जाहिरातींमधील सेलिब्रिटींची लोकप्रियता वाढत गेली.
गेल्या दहा वर्षांत उत्पादनांचा ग्राहकांशी संवाद होण्याच्या दृष्टीने सेलिब्रिटींचा वापर करून घेण्यात मोठी वाढ झालेली आहे. सध्या देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील लहान-मोठे सुमारे 500 ब्रँड त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिरातींमध्ये सेलिब्रिटींचा वापर करत असल्याची माहिती आयआयएचबीचे संदीप गोयल यांनी दिली आहे.
आयआयएचबीच्या या अहवालात बॉलिवुडमधील 69, टीव्हीवरील 67, क्रीडा क्षेत्रातील 37 आणि प्रभावी दांपत्ये म्हणून 7 एवढ्या जणांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वात देखणा, बिनधास्त, स्टायलिश, भुरळ पाडणारा आणि ट्रेंन्डी सेलिब्रिटी म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव पुढे आले
आहे.
आकर्षकपणाच्या निकषाचा विचार केला तर कोहली पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री अलिया भटचे नाव आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे सर्वात कल्पक, जमिनीवर असणारा, मित्रासमान आणि सचोटीचा सेलिब्रिटी म्हणून पाहिले जाते. त्यानंतर अभिनेता अक्षयकुमार, दीपिका पदुकोण, नवाजुद्दीन सिद्दीकी यांची नावे आहेत.