टाकळीभान – श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावरील खोकर फाट्यानजीक माल वाहतूक टाटा मॅजीक टेम्पो व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व त्याच्या सोबत असलेल्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान दुचाकीचालक व त्याच्या पत्नीचे निधन झाले.
गुरुवारी (दि.30) सांयकाळी दुचाकीवरून भोकर हनुमानवाडी येथील रामकृष्ण भोईटे (वय 30) त्याची पत्नी सविता भोईटे (वय 28) व निर्मला विठ्ठल कोतकर मुठेवाडगाव यांना घेऊन श्रीरामपूर येथील लग्नमारंभ उरकून भोकर येथील हनुमानवाडी येथील घरी जात होते. खोकर फाटयाजवळ श्रीरामपूरकडे जात असलेल्या टाटा मॅजिक या मालवाहतूक गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसल्याने रामकृष्ण व त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोन महिलाही जबर जखमी झाल्या.
या अपघातात टेम्पो चालकही गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार करुन त्या तिघांनाही लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात रामकृष्ण भोईटे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी सविता यांचाही राञी उशिराने उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून रुग्णालयापर्यंत पाठवले.