पावसाअभावी बळीराजा चिंतेत

– संतोष वळसे पाटील

मागील अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्यासह हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तसेच ढगाळ वातावरण होऊनही पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत. रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मृग नक्षत्रही संपत आले आहे. पाऊस अद्यापही आला नसल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

गतवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने हुलकावणी दिली होती. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात नेहमी येणाऱ्या वळवाच्या पावसानेही हुलकावणी दिली. तसेच एप्रिल, मे महिन्यात मोसमी पावसाच्या अगोदर होणारा वळवाचाही पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाईत मोठी भर पडली. त्याचे दूरगामी परिणाम सध्या जाणवत आहे. विहिरी, कुपनलिका, पाझरतलाव, नदीपात्रे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. पाणी संपल्याने पाण्याच्या टंचाईत भर पडली. जनावरांचा हिरवा चाराही करपला आहे.

तसेच ऊस, तरकारी पिके हे जनावरांचे खाद्य बनले. सातगाव-पठार, आदिवासी भाग आणि नदीकाठच्या गावांत पिण्याच्या पाण्याचे एकुण 25 टॅंकर सुरू आहेत. तसेच चारा छावण्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पराग कारखान्याच्या वतीने सुरू आहेत.दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झालेले शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाऊस होईल अशी परिस्थिती निर्माण होते. आकाशात काळे ढगही तयार होतात, परंतु प्रत्यक्षात पाऊस पुरेसा पडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वेळेवर चांगला पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाला नव्हता. त्यामुळे तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागला. तसेच जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे या वर्षी चांगला पाऊस पडवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.