पीएमपीच्या अटी, शर्थींना केराची टोपली

कंत्राटदारांवर कारवाई कधी? प्रवाशांकडून उपस्थित होतोय प्रश्‍न

पुणे – टिळक रस्त्यावर 5 दिवसांपूर्वी बंद पडलेल्या बसच्या दुरुस्तीसाठी गेलेल्या सर्व्हिस व्हॅनवर (बस) झाड कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. मात्र, संबंधित ठिकाणी बंद पडलेली बस कंत्राटदाराची होती. यामुळे या बसच्या दुरुस्तीसाठी पीएमपीएमएल प्रशासनाने

स्वतःच्या खात्यातील सर्व्हिस व्हॅन पाठवलीच कशी? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे बसेस पुरविताना पीएमपीएमएल प्रशासनाने कंत्राटदारांना घालून दिलेल्या अटी व शर्थींना कंत्राटदारांनी केराची टोपली दाखविल्याचे दिसत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 600च्या सुमारास भाडेतत्त्वावरील बसेस आहेत. विविध कंत्राटदारांकडून या बसेस उपलब्ध करून दिल्या जातात.

यामध्ये संबंधित बसवर चालकाची नियुक्‍ती, बसेसची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. यामुळे बस बंद पडल्यास दुरुस्त करून पुन्हा संचलनासाठी उपलब्ध करून देणे कंत्राटदाराचे काम आहे. गेल्या बुधवारी टिळक रस्त्यावर बंद पडलेली बस कंत्राटी होती. ही बस ओढून नेणे, दुरुस्त करण्याचे काम ठेकेदाराने करणे अपेक्षित होते. मात्र, पीएमपीएमएल प्रशासनाने याठिकाणी आपली सर्व्हिस व्हॅन पाठवली. याच व्हॅनवर झाड कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पीएमपीएमएल ताफ्यातील कंत्राटी बसेसची दुरुस्तीही पीएमपीएमएल प्रशासनाला करावी लागत असल्याचे समोर आले. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांना अभय देण्यात येते का? असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

कंत्राटदारांची मनमानी सुरू
ब्रेकडाऊन, बसेसला आग लागणे यांसारख्या घटनांमध्ये पीएमपीएमएल ताफ्यातील कंत्राटी बसेसची संख्या जास्त आहे. मात्र, प्रशासनाकडून कंत्राटदारांवर ठोस कारवाई केली जात नसल्याने प्रवाशांकडून वरिष्ठांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या कामचुकारपणाला आळा घालण्यासाठी पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदारांना लावण्यात येणारे दंडाचे प्रमाण वाढवले होते. मात्र, सध्या हे दंडाचे प्रमाण कमी केल्याने कंत्राटदार मनमानी पद्धतीने वागत आहेत.

टिळक रस्ता हा वर्दळीचा असल्याने या ठिकाणी बस बंद पडल्यास कोंडी होण्याची शक्‍यता आहे. यामुळे या ठिकाणी पीएमपीएमएल ताफ्यातील सर्व्हिस व्हॅन पाठवण्यात आली होती.
– सुभाष गायकवाड, प्रशासकीय अधिकारी, पीएमपीएमएल

Leave A Reply

Your email address will not be published.