सांगली : सांगली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. रिंगरोडच्या श्रेयावरून आजी माजी खासदार व्यासपीठावरच एकमेकांबरोबर भिडले.
यावेळी माजी खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांचा एकेरी उल्लेख करत ए बस खाली म्हणाले. यावेळी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुमनताई पाटील यांच्यासमोरच ही वादावादी झाली.
काय घडले नेमके?
खासदार विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याचे श्रेय रोहित पाटील यांना दिल्याने संजय काका यांनी आपल्या भाषणात बोलताना विशाल पाटील यांना डिवचले. विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात, असे म्हणत टीकास्त्र सोडले.
तीन दिवसांपूर्वी विटामधील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी 173 कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती .या रिंग रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता. त्यामुळे तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकत्यांनी या निर्णयाबद्दल फटाके वाजवून जल्लोष करत शहरात बॅनर लावले होते.
गडकरींच्या भाषणातील हाच मुद्दा विशाल पाटील यांनी आज पुन्हा या कार्यक्रमात मांडला. त्यामुळे संजयकाका चांगलेच चिडल्याने त्यांच्यात आणि विशाल पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण शांत करायचा प्रयत्न केला.