सूरत – गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील एका गावात स्थलांतरित मजूर आणि पोलिसांमध्ये आज जोरदार धुमश्चक्री झाली. त्या जिल्ह्यातील मोरा गावात पोलिसांनी एका स्थलांतरित मजुरांच्या जथ्थ्याला पुढे जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच हल्ला सुरू केला.
या गावाजवळच हजारीया येथे औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या मजुरांची या भागात मोठी संख्या आहे. आम्हाला गावी जाऊ द्या या मागणीसाठी या मजुरांनी तेथे मोठाच राडा केला.जिल्हा प्रशासनाने उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा या राज्यात जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी त्यांची मागणी होती.
पोलिसांनी या भागाला वेढा देऊन या मजुरांवर नियंत्रण मिळवले. त्यातील चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुजरातमध्ये ठिकठिकाणी पोलीस व या मजुरांमध्ये मोठा संघर्ष झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.