स्मार्ट सिटी स्पर्धेत पुण्याचा 28 वा नाही, तर ‘हा’ आला क्रमांक

वेळकाढूपणामुळे घसरले मानांकन ; प्रकल्पांची माहिती केली नाही "अपडेट'

पुणे- स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामांची माहिती “अपडेट’ करण्यात स्मार्ट सिटी प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट शहरांच्या मानांकनात देशात पुणे 28 व्या क्रमांकावर गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने केंद्राच्या संकेतस्थळावर तातडीने प्रकल्पांची माहिती “अपडेट’ केली. त्यामुळे केंद्राच्या नवीन मानांकनानुसार, आता पुणे राज्यात पहिल्या क्रमांकावर आले असून देशात पुण्याला 15 वे स्थान मिळाले आहे.

केंद्र शासनाने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या मानांकनात पुण्याचा 28 वा क्रमांक होता. त्यामुळे स्मार्ट सिटी स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुणे शहराचे स्मार्ट सिटीचे रॅकिंग घसरल्याने सर्व स्तरावरून टीका सुरू झाली. विशेष म्हणजे, महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही मानांकन घसरल्याने शहराची नाचक्की झाली होते. ही रॅकिंग जाहीर झाल्यानंतर स्मार्ट सिटीने तातडीने बैठका घेऊन प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यावेळी अनेक कामांची माहितीच केंद्रास पाठवली नसल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ही माहिती “अपडेट’ केली. तसेच केंद्रशासनास याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर सुधारित मानांकनामध्ये पुण्यास 15 वे मानांकन मिळाले आहे.

“लॉकडाउनपूर्वी सुरू केलेली कामे सुरू आहेत. करोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीने “एचआयएमएस’ प्रकल्पाअंतर्गत नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर रूमद्वारे प्रशासन सर्वतोपरी योगदान देत आहे. यामुळे स्मार्ट सिटीची कामगिरी उंचावली आहे,’ असे पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

कारवाई होणार का ?
स्मार्ट सिटीकडून माहिती “अपडेट’ न केल्याने मानांकन घसरल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारे वेळकाढूपणा करत माहिती “अपडेट’ न ठेवल्याने शहराच्या झालेल्या बदनामीप्रकरणी स्मार्ट सिटी कोणावर जबाबदारी निश्चित करणार, कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.