निमोणे (वार्ताहर): पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी शिरुर तालुक्यात शिक्रापूर, निमगाव म्हाळुंगी, टाकळी भीमा, दहिवडी, न्हावरा, आंबळे, चव्हाणवाडी या गावांना भेट देऊन क्षेत्रीय पाहणी केली. या पाहणीच्या वेळी शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेतला व शेतकऱ्यांच्या उत्पादन व नफ्यात वाढ होण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या दौऱ्यावेळी तालुका कृषी अधिकारी शिरुर सिद्धेश ढवळे हे सोबत होते.
विभागीय कृषी सहसंचालक यांनी सकाळी यशदा पुणे येथे शेतमाल निर्यात या विषयावर आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गास उपस्थिती नोंदवुन दुपारी शिरुर तालुक्याच्या दौऱ्यास सुरवात केली. त्यांनी प्रथम शिक्रापूर येथे जकाते यांची फळबाग नर्सरी,सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉट तसेच निमगाव म्हाळुंगी येथे पॉलीहाऊस मधील विदेशी भाजीपाला व पॉलीहाऊस मधील ढोबळी मिरची पाहणी करुन शेतकरी करत असलेले शेळी पालन व्यवसायाची माहिती घेतली.
नंतर कृषि विभागाच्या पीएमएफएमई योजनेत अंतर्गत उभारण्यात आलेल्या टाकळी भिमा येथे श्रीराम सोया प्रॉडक्ट प्रकल्प व दहीवडी येथे संस्कृती कॅटल फिड प्रकल्पास भेट देऊन माहिती जाणून घेतली. न्हावरा येथे प्रा डॉ गोविंद निंबाळकर यांच्या प्रक्षेत्रात एक डोळा पध्दतीने ऊस लागवड प्रात्यक्षिक पाहणी करुन सुपरकेन नर्सरी बाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. तसेच निर्वी येथे रमेश पवार यांच्या अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी केलेल्या मुग पिकाच्या प्लॉटची पाहणी करून शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञाचे मार्गदर्शन केले.
त्यावेळी शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञान वापर केलेला प्लॉट व बीबीएफ तंत्रज्ञानचा वापर न केलेला प्लॉट अशा दोन्ही तुलनात्मक प्लॉट ची पाहणी करून उत्पादनातील फरक लक्षात घ्यावा अशा सुचना दिल्या. यावेळी निर्वी येथे प्रयोगशील शेतकरी शामराव शेलार,विलास सोनवणे,दत्तात्रय सोनवणे,संजय सोनवणे,चांगदेव ढवळे इत्यादी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आंबळे येथे धनजय बेंद्रे यांच्या प्रक्षेत्रास भेट देऊन ते करत असलेल्या सेंद्रिय शेतीची पाहणी करून शहरी भागास भाजीपाला वितरण बाबत मार्गदर्शन केले.
चव्हाणवाडी येथे जाऊन राज्यस्तरीय बाजरी पिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या चव्हाणवाडी गावच्या ताराबाई बांदल व तृतीय क्रमांक मिळालेल्या गुनाट येथील प्रयोगशील शेतकरी योगेश गाडे त्यांचा सन्मान केला. शेतकऱ्यांसोबत कृषि विभागाच्या कामाबद्दल चर्चा केली असता शेतकऱ्यांनी देखील कृषि विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. दौरा पूर्ण झाल्यावर क्षेत्रीय स्तरावर आवश्यक सूचना देऊन शिरुर कृषि विभागाच्या कामाबद्दल विभागीय कृषी सहसंचालक यांनी देखील समाधान व्यक्त केले.
विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी स्वतः शिरुर तालुक्यात येऊन शेतकऱ्याच्या बांधवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने प्रा डॉ गोविंद निंबाळकर,योगेश गाडे, धनंजय बेंद्रे, ताराबाई बांदल यांना विशेष कौतुक वाटले. या दौऱ्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले होते. तसेच दौऱ्यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक उपस्थित होते.