शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथे बांधकाम व्यवसायाच्या कामाच्या पैशाच्या वादातून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शरबजीत चौहान, रामधनिक चौहान, कनिकराम चौहान, अजय चौहान, सचिनकुमार यांसह एका अनोळखी युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
. याप्रकरणी याबाबत इप्तेकार अहमद खान (वय 29, रा. शिक्रापूर, ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. शिक्रापूर येथे परप्रांतीय इप्तेकार खान यांचे बांधकामातील पियुपी करण्याचा व्यवसाय आहे. कनिकराम चौहान याचा पियुपीचा व्यवसाय आहे.
इप्तेकार खान याच्या कामगारांनी कनिकराम याच्या येथे काही काम केलेले असताना त्यांच्या कामाचे एक लाख रुपये झाले होते. त्यापैकी तीस हजार रुपये कनिकराम याच्याकडे बाकी होते. त्यामुळे इप्तेकार खान हा वेळोवेळी पैशाची मागणी करीत होता.
सायंकाळी कनिकराम याने इप्तेकार खान याला पैसे घेण्यासाठी शिक्रापूर जनसेवा बॅंकेच्या समोरील पान टपरीमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी इप्तेकार खान पैसे घेण्यासाठी आला असताना तेथे लपून बसलेल्या सहा जणांनी त्याला बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस नाईक विकास पाटील करीत आहेत.