-आर्थर यांना पुन्हा अर्ज करावा लागणार
कराची – पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्या पदाचा कार्यकाळ विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला असून त्यांना पुन्हा हे पद घेण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, आर्थर यांनी नुकतीच मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी व व्यवस्थापकीय संचालक वासीम खान यांची भेट घेत पुन्हा काम करण्याची तयारी दर्शविली आहे. आर्थर यांनी फेरनियुक्तीसाठी रीतसर अर्ज दाखल करावा असे त्यांना सुचविण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या विश्वचषकातील कामगिरीबाबत आढावा घेतला जाणार आहे.
मणी व वासीम हे दोघेही सध्या इंग्लंडमध्ये आहेत. ते मायदेशी आल्यानंतर संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल. पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेतील साखळी गटातच पराभूत व्हावे लागले होते. त्यातही भारताकडून त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे संघातील काही खेळाडूंना डच्चू द्यावा तसेच संघाच्या प्रशिक्षक व अन्य सपोर्ट स्टाफ म्हणून नवीन चेहरे घ्यावेत अशी मागणी अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी केली आहे.
संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याच्याकडेच मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी नेतृत्त्व ठेवावे व कसोटीकरिता वेगळा कर्णधार असावा असेही मत काही वरिष्ठ खेळाडूंनी व्यक्त केले आहे.