‘सुरक्षिते’च्या शोधात

– हेमंचद्र फडके

सत्तेची खुर्ची कोणा राजकीय नेत्याला नकोशी वाटेल? प्रत्येकालाच त्या खुर्चीचा मोह आहे. सत्ता एकदा मिळाली की ती सोडवत नाही हे देखील खरे आहे. निवडणूक आली की दिग्गज नेत्यांना सुद्धा उमेदवार म्हणून रिंगणात उतरताना पराभवाची भीती वाटते आणि त्यांची रात्रीची झोप उडून जाते. त्यांना आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधावी लागते.

2014 मध्ये प्रचंड लोकप्रियतेची लाट असूनही मोदी स्वतःही बडोदा आणि बनारस या दोन ठिकाणांची निवड करून मैदानात उतरले होते. बडोदामध्ये ते निवडून येणार याची खात्री होतीच पण बनारसमध्येही त्यांच्या आशा पल्लवित होत्या. तरीही ते दोन्ही ठिकाणांहून लढले. सध्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही स्थिती काहीशी अशीच झाली आहे. राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील मतदारांनी त्यांना लागोपाठ तीन वेळा संसदेत पाठवले आहे. यंदाही ते या मतदारसंघातून लढणार आहेतच; पण तरीही दक्षिण भारतातील कोणत्यातरी जागेवरून राहुलबाबा निवडणूक लढवण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे. केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष ए. रामचंद्रन यांनी त्यांना राज्यातून निवडणूक लढवण्याचे आमंत्रण दिले आहे.

दुसरीकडे बसपा अध्यक्षा आणि थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणाऱ्या नावांपैकी एक असणाऱ्या बहनजी मायावती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 2014 च्या लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशात बसपाचा भोपळाही फुटला नव्हता. इकडे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लालकृष्ण आडवाणी यांचे क्षेत्र असलेल्या गांधीनगरची निवड केली आहे. गेल्या सहा निवडणुकांमध्ये ते सारथी होते. गांधीनगर शहा यांना स्वतःसाठी अत्यंत सुरक्षित वाटते आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आपले वडील मुलायमसिंह यादव यांच्या आझमगढ क्षेत्रातून स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे. मुलायमसिंहांना मैनपुरी हे क्षेत्र दिले आहे. अखिलेश आपली पारंपरिक कन्नौजची जागा पत्नी डिंपल यादव यांच्यासाठी सोडत आहेत. त्यामुळेच त्यांना अशा जागेचा शोध होता जी सुरक्षित आहेच पण जातीय समीकरणांच्या आधारे आसपासच्या काही जागांवरही त्यांचा प्रभाव दिसून येईल. त्यासाठी आझमगडची निवड करण्यात आली. अर्थात ही जागा सपाचा बालेकिल्ला कधीच नव्हती. पण सपा- बसपा यांच्या आघाडीनंतर यादव, मुसलमान आणि दलित मतांच्या बळावर अखिलेश यांना निवडून येण्यास काहीच अडचण येणार नाही. कारण तिथे 4 लाख यादव, 3 लाख मुसलमान आणि 2.75 लाख दलित मतदार आहेत. या जातींचा प्रभाव जवळपासच्या डझनभर जागांवर होणार आहे. यामध्ये गाझीपूर, जौनपूर, सलेमपूर, घोसी, लालगंज, आंबेडकरनगर, संत कबीर नगर, देवरिया, गोरखपूर, कुशीनगर आणि बलिया यांचा समावेश करता येईल. अखिलेश आणि मायावती यांचा आझमगढच्या निमित्ताने इथेही जातीचे गणित बसवण्याचा प्रयत्न असेल.

एकुणात प्रत्येक मोठा नेता जोडतोडीचे राजकारण करून निवडणुकांमध्ये स्वतःच्या जागेबरोबरच सत्तेत विराजमान होऊ पाहात आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर झाले आहेत. इतर सहा टप्प्यातील उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी किती नेते आपल्या जागा बदलतील, किती नेते एकापेक्षा अधिक जागांवर निवडणुका लढवतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्तेच्या महायज्ञात प्रत्येकाला आहुती वाहायची आहे पण स्वतःला त्याची झळ लागूही द्यायची नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.