संगमनेरमध्ये 1,074 रुग्णांनी केली करोनावर मात

59 गावांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्‍यामध्ये प्रशासनाच्या वतीने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले असल्यामुळे जुलै पाठोपाठ आता ऑगस्ट महिना संपत आला तरी करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरी 85 टक्के आहे. संगमनेर शहर आणि तालुक्‍यात आढळून आलेल्या 1272 करोनाबधित रुग्णांपैकी 1074 रुग्णांनी करोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तसेच आत्तापर्यंत तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील 89 गावापैकी 59 गावांनी रुग्णसंख्या शून्यपर्यंत नेण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला विविध कोविड रुग्णालयांमध्ये शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील अवघ्या 25 ते 30 गावातच खऱ्या अर्थाने करोनाबाधित रुग्ण असून त्या 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजच्या स्थितीत 88 गावातील 59 गावांनी तर करोनाला घरचा रस्ता दाखविला आहे. या 59 गावातील सर्व करोनाबाधितांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या या गावातील रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.

संगमनेर शहराच्या जवळ जवळ सर्वच भागात करोनाने आपले पाय पसरवले असून तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील 171 गावांपैकी 89 गावापर्यंत तो जाऊन पोहचला आहे. संगमनेर शहरातील किरकोळ उपनगरे सोडली तर जवळजवळ संपूर्ण शहरातच करोना पसरला आहे. शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात तर सर्वाधिक 85 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 81 रुग्णांनी करोनावर मात केली असून एकाला आपला जीव गमवावा लागला असुन 3 जणांवर उपचार सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकावर निमोण हे गाव असून या गावात 74 रुग्ण आढळून आले असून त्यातील 60 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर कुरण हे गाव तिसऱ्या क्रमांकावर असून या गावात 60 रुग्ण आढळून आले असून त्यातील 59 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर सध्या एका रुग्णावर उपचार सुरू आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर गुंजाळवाडी हे गाव असून या गावात 29 रुग्ण आढळून आले असून त्यातील 25 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

तर 4 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर कसारा दुमाला गाव असून या गावात 26 रुग्ण आढळून आले असून त्यातील 21 रुग्णांनी करोनावर मात केली आहे, तर दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर तीन रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यानंतर गुंजाळवाडी गावातच असणाऱ्या ढोलेवाडी या छोट्या वाडीचा सहावा क्रमांक लागतो. या वाडीत तर करोनाने कहरच केला आहे. या वाडीत 22 रुग्ण आढळून आले असून त्यातील 16 रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे

संगमनेर तालुक्‍यामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या तेराव्या शतकाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर आपण नक्कीच करोनाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.