मॉस्को (रशिया): रशियाबरोबरच्या संबंधांना नव्या परिमाणांच्या आधारे पुनरुज्जीवीत करण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आज रशियामध्ये दाखल झाले. मॉस्कोच्या वनूकोव विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यातल्या नियोजित बैठकीच्या पार्श्वभुमीवर मॉस्कोमध्ये जय्यत तयारी केली जात आहे. ही भेट आणि चर्चा ऐतिहासिक असून दोन्ही देशांमधील संबंध, सर्वसमावेशक भागीदारी आणि संरक्षणात्मक माहितीची आदान-प्रदान नवीन पर्वाला सुरुवात करतील. तसेच चीन आणि रशियामधील विकासाला मोठी चालनाच मिळणार आहे, अशी खात्री जिनपिंग यांनी म्हटले आहे.
रशियाने क्रिमियाला जोडून घेतल्याने पाश्चिमात्य देशांबरोबर रशियाचे तीव्र मतभेद झाले होते. त्यानंतर 5 वर्षांनी जिनपिंग यांचा हा पहिलाच रशिया दौरा होत आहे.
रशियाची परंपरागत राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथेही जिनपिंग हे जाणार आहेत. तेथे पुतीन यांनी आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. जिनपिंग यांच्या समवेत आलेल्या चिनी शिष्टमंडळाने रशियाला भेट देण्यासाठी 2 पांडा आणले आहेत.