नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे 27 आणि 23 पैशांची वाढ केली. त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोलपाठोपाठ डिझेल दरानेही शंभरी पार केली. तर, पेट्रोल दराचे शतक ठोकणारे कर्नाटक सातवे राज्य बनले.
मागील महिन्यापासून इंधन दरवाढीचे सत्र सुरू आहे. सार्वजनिक कंपन्यांनी 18 दिवसांच्या विश्रामानंतर 4 मे यादिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 23 वेळा दोन्ही इंधने महागली आहेत.
दरवाढीच्या सत्रामुळे मागील महिन्यापासून पेट्रोल 5.72 रूपयांनी, तर डिझेल 6.25 रूपयांनी महागले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगण आणि लडाखमध्ये पेट्रोल दराने याआधीच शंभरी ओलांडली आहे. त्या यादीत आता कर्नाटकची भर पडली आहे.
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वांधिक आहेत. तिथे प्रतिलिटर पेट्रोलसाठी 107.22 रूपये, तर डिझेलसाठी 100.05 रूपये मोजावे लागत आहेत.