रायगडमध्ये यंदा चुरशीची लढत

रायगड या लोकसभा मतदारसंघात मुंबई उपनगर, जिल्ह्यातील 4 व रत्नागिरी जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये 191-पेण, 192 अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड, 263-दापोली आणि 264-गुहागर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र मिळून या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड व गुहागर या चार तालुक्‍यांचा व चिपळूण तालुक्‍यातील रामपूर, खारावटी व वहाळ या महसूल मंडलाचा समावेश या लोकसभा मतदारसंघात होतो. रायगड जिल्ह्यातील अलीबाग, पेण, रोहेर, सुधागड, मुरूड, माणगाव, मसडे, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व तळा या 11 तुलक्‍यांचा समावेश या लोकसभा मतदारसंघात होतो.

रायगड लोकसभा मतदारसंघात शहरी लोकसंख्या कमी झाली असून ग्रामीण भागाचा समावेश असल्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची लोकसंख्या अनुक्रमे 17 हजार व 1 लाखाने कमी झाली असून आगरी जातीचा या मतदारसंघात प्रभाव आहे. तसेच कुणबी व मुस्लीम या समाजाचा तुलनेने जास्त प्रभाव असून या दोन सामाजिक आधारावर येथील राजकारण अवलंबून आहे. येथे खुला प्रवर्ग 28.13 टक्‍के, ओबीसी 39 टक्‍के, अनुसूचित जाती-जमाती मिळून 10 टक्‍के आणि इतर 22 टक्‍के आहेत.

2009 च्या निवडणुकीत मतदारसंघाच्या पुनर्रचनेत रायगड मतदारसंघाला शेजारच्या रत्नागिरी मतदारसंघातील दापोली आणि गुहागर हे विधानसभा मतदारसंघ जोडले गेले. पूर्वीच्या रायगड मतदारसंघातील उरण, पनवेल आणि कर्जत हे मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघाला जोडले गेले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ पूर्वापारपासून शिवसेनेच्या प्रभावाखाली आहेत. रायगड जिल्ह्यात शिवसेनेला अथक प्रयत्न करूनही अजून आपला पाया विस्तारता आलेला नाही. 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून बॅ. ए. आर. अंतुले यांना उमेदवारी दिली गेली होती. त्या लढतीत गीते यांनी अंतुले यांचा जवळपास पावणेदोन लाख मताधिक्‍याने पराभव केला. शिवसेनेच्या या विजयात शेतकरी कामगार पक्षाचेही मोठे योगदान होते.

अलिबाग, पेण या विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे. त्याचा फायदा गीते यांचे मताधिक्‍य वाढण्यात झाला. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे आपल्या पक्षाची ताकद वाढवत असल्याने त्याचा फटका शेतकरी कामगार पक्षाला बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाढत्या प्रभावाला पायबंद घालण्यासाठी तसेच आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी कामगार पक्ष हा शिवसेनेच्या विचारसरणीच्या विरोधातील पक्ष समजला जातो. त्यामुळेच जयंत पाटील यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयाबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले गेले होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभावापुढे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडे शिवसेनेशी समझोता करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

2014 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी शिवसेनेशी काडीमोड घेत रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जाहीर केले होते. मावळ मतदारसंघातून शेकापने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली होती. रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी नेते आणि चिपळूणचे माजी नगराध्यक्ष रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेशी काडीमोड घेण्याचा आपला इरादा आहे असे जाणवू दिले नव्हते. मात्र, अचानक शिवसेनेशी फारकत घेण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केला. “शेकाप’च्या या धक्‍कातंत्रामुळे रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांपुढे अडचणी निर्माण झाल्या. रमेश कदम हे सुनील तटकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात असताना ते बंड करण्यास धजावतील असे कोणालाच वाटले नव्हते. पण ते रिंगणात उतरले. दुसरीकडे सुनील तटकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लोकसभेच्या रिंगणात उतरले. तटकरे विरुद्ध गीते ही लढत अत्यंत चुरशीची झाली. गीते यांनी 3,96,178 मते मिळवत विजय मिळवला असला तरी तटकरे यांनी 3,94,068 मते मिळवत गीतेंना अक्षरशः घाम फोडला. रमेश कदमांनी गतवेळच्या निवडणुकीत 1,29,730 मते मिळवली.

रायगड जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत राजकीय सुप्तसंघर्षही आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम हे गुहागर मतदारसंघातून लढत होते. त्यावेळी गीते यांनी आपल्याला पराभूत करण्यासाठी हालचाली केल्या असा कदम यांना संशय होता. यामुळेच कदम यांनी यावेळी गीते यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला होता. शिवसेना नेतृत्वाकडून कदम यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले; पण पडद्यामागे काय घडले हे निवडणुकीतील चुरशीने दाखवून दिले. यावेळीही सुनील तटकरेच पुन्हा रायगड जिल्ह्यातून उतरण्याची दाट शक्‍यता आहे. गतवेळी निसटलेला डाव जिंकण्यासाठी तटकरेंसह राष्ट्रवादी कॉंग्रेस संपूर्ण ताकद पणाला लावत आहे.

दुसरीकडे सातव्यांदा निवडून जाण्याची संधी साधण्यासाठी अनंत गीतेही तयारीला लागले आहेत. गेल्या चार वर्षांत राजकीय समीकरणे बरीच बदलली आहे. शेकाप आणि राष्ट्रवादीमध्ये अलिखित समझोता झाला आहे. जिल्हा परिषदेत सत्ता मिळवून त्यांनी या समझोत्यावर शिक्‍कामोर्तब केले आहे. शेकापचा या मतदारसंघातील प्रभाव लक्षात घेता आणि गतवेळचा 2 हजारांच्या फरकाने मिळवलेला विजय पाहता गीते यांना यंदा विजयासाठी झुंजावे लागणार आहे. भाजपा-सेना युती झाली असली तरी भाजपाचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. तथापि, मागील दाराने काही हातमिळवणीची खेळी झाल्यास निवडणुकीचे रंग बदलू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.