पुरंदरमध्ये “जल’ऐवजी स्वत:चे “संधारण’

भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने कृषी विभाग अडकला चौकशीच्या फेऱ्यात

वाघापूर – पुरंदरवर वर्षानुवर्षे बसलेला दुष्काळी हा शिक्‍का कायमचा पुसण्यासाठी राज्य शासनाने पुरंदर तालुक्‍यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र, जलसंधारण करण्याऐवजी एकमेकांची खिसे भरण्याचे आणि स्वतःचे संधारण करून जनतेला कोट्यवधी रुपयांना लुटण्याचा गावचे कारभारी, ठेकेदार, कृषी अधिकारी, पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांचा सुरू असलेला खेळ आता थांबला आहे. धनादेशावर स्वाक्षऱ्या करून लाखो रुपयांची कमाई केली; परंतु आता थेट एसीबी चौकशी होणार असल्याने संपूर्ण कृषी विभाग पूर्णपणे चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. तर याच काळात पाणलोट समित्यांनी केलेल्या कामांचीही चौकशी होणार असल्याने गावोगावच्या पाणलोट समित्यांचे पदाधिकारी चांगलेच गडबडले आहेत.

संपूर्ण राज्यात जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामामुळे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या पुरंदर तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. विधान मंडळात याचे पडसाद उमटल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराची उकल करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतींनी एसीबी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुरंदर तालुक्‍यात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याच्या तयारीत आहेत. तर तालुक्‍यातील कृषी विभागाची थेट वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार असल्याने गावोगावी लाखो रुपयांची खोटी बिले काढणारी संपूर्ण साखळीच आता उघड होणार आहे.

खेड तालुक्‍यातील माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी पुरंदर तालुक्‍यात जलसंधारणाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती अधिकारात माहिती मागवून उघड केले. त्यांनी कृषी विभागाकडे माहिती मागितली, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना सरळ माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली, त्यामुळे त्यांनी कायद्याचा वापर करून माहिती मिळविली आणि संपूर्ण राज्याचे डोळे दिपतील अशी माहिती मिळविली. या माहितीची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा पातळीवरील कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, यांच्यासह सातारा, सोलापूर, अहमदनगर आदि जिल्ह्यांचे मंडल कृषी अधिकारी यांची स्वतंत्र पथके करून अत्यंत गोपनीय चौकशी करण्यात आली. आणि हा अहवाल राज्य शासनाकडे दिल्यानंतर संपूर्ण राज्यच आवक झाले आहे.

शिवसेना-कॉंग्रेस सामन्याचा ट्रेलर सुरू, सिनेमा बाकी
राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नुकतेच पुरंदरमध्ये पत्रकार परिषद घेवून आपला याच्याशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच तालुक्‍याचे कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांनी हे घोटाळे कंत्राटदार यांच्या मदतीने केले असून गुन्हेगारांना शासन कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही असे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर षड्‌यंत्रण केल्याचा आरोप केला आहे. तर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही पत्रकार परिषद घेवून खुली चौकशी केल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचे खुले आव्हान दिले आहे. तसेच राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलेल्या गैरकारभारांची जंत्रीच बाहेर काढणार असल्याचे सांगितले असल्याने आगामी काळात शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस या सामन्याचा ट्रेलर सुरू झाला असून विधानसभा निवडणुकीवेळी याचा सिनेमा दिसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चौकशी समितीचा अहवाल म्हणतो की…
पुरंदर तालुक्‍यातील संपूर्ण राज्यात उत्कृष्ट काम म्हणून पुरस्कार मिळविलेल्या पानवडी या गावासह कोडीत बुद्रुक, वाल्हे, टेकवडी, निळूंज, सोनोरी यांसह अनेक गावांत दर्जाहीन, निकृष्ट तसेच आवश्‍यक नसताना बोगस कामे केल्याचे उघड झाले आहे. अनेक कामांमध्ये अनियमितपणा आहे, ठिकठिकाणी खोटी बिले सादर करून ती मंजूर करून घेतली आहेत, ज्या ठिकाणी शेती बांध आहे अशा ठिकाणी नाला बंधारा असल्याचे दाखवून बिले काढली आहेत. कित्येक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी सांडवा नाही, अंदाज पत्रक चुकीचे केले आहेत, माती नाला बांधात काळी माती भरलेली नाही,

ई निविदा न काढताच केला खर्च
महात्मा फुले जलभूमी अंतर्गत तब्बल साडेपाच कोटींचा निधी ई निविदा न काढता खर्च केले आहेत, तीन लाख रुपयांच्या वरती ई निविदा काढणे आवश्‍यक असताना दीड कोटी रुपयांपर्यंतची कामे निविदा न काढता केली आहेत केवळ कृषी अधिकाऱ्यांचा पाहुण्यास मशीन कामासाठी 1 कोटी 60 लाख रुपयांची नियम बाह्य कामे दिली आहेत. नाला खोलीकरण व बांधाची कामे न करताच कामे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. सलग समतल चरांची कामे डोंगराळ भागात दाखवून फक्त 15 ते 16 टक्‍के कामे झाली असताना बिले मात्र, संपूर्ण काढण्यात आली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)