नवी दिल्ली : पंजाबमध्ये करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र या व्यक्तीमुळे राज्यातील २३ जणांना लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. १८ मार्च रोजी या व्यक्तीचे निधन झाले. पंजाबमध्ये एकूण ३३ जणांना करोनाची लागण झाली असून यापैकी २३ जण हे त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आले होते अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे.
गुरुद्वारात धर्मगरु असणाऱी संबंधित ७० वर्षीय व्यक्ती दोन आठवड्यांसाठी परदेशात वास्तव्यास होती. जर्मनी आणि इटली येथे आपल्या शेजारच्या गावातील दोन मित्रांसोबत ते गेले होते. मात्र परतल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले नव्हते. अनेकांची ते भेट घेत होते. ६ मार्च रोजी ते दिल्लीत पोहोचले आणि तेथून पंजाबला वाहनाने प्रवास केला.
धक्कादायक म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी १०० जणांची भेट घेतली होती. त्यांनी आणि त्यांच्या दोन्ही मित्रांनी राज्यातील १५ गावांचा दौरा केला होता. त्यांच्या कुंटुंबातील १४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा नातू आणि नातीने तर हजारो जणांची भेट घेतली आहे.
तिघांच्या बेजबाबदार वागण्यामुळे अधिकारी प्रत्येक गावाला भेट देत असून त्यांनी भेट घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करत आहेत. या तिघामुळे मोहाली, अमृतसर, होशियारपूर, जलंधर या गावातील काही लोकांना करोनाची लागण झाली आहे. सध्या देशभरात करोनाचे एकूण ७०० रुगण असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे.