पुणे – शहराला करोनाचा विळखा झपाट्याने वाढत असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज 25 ते 40 ने ही संख्या वाढत आहे. मात्र, गेल्या 24 तासांत पुणे शहरात केवळ 7 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशी परिस्थिती पुढील चार-पाच दिवस राहिली पाहिजे, त्यानंतर ही संख्या अजून कमी होणे गरजेचे आहे.
ज्यावेळी शहरात 15 दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडणार नाही, त्याचवेळी आपण ही साखळी तोडली असे म्हणू शकू. त्यासाठी नागरिकांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आतापर्यंत पुणे शहर आणि ग्रामीण भागात मिळून 185 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पुणे शहरात 133, ससून रुग्णालयात 39 आणि ग्रामीण भागात 8 रुग्ण आहेत. त्यातील 18 जणांना आतापर्यंत उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर 118 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नायडू रुग्णालयात 105, कर्वेरोड आणि हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1, केईएम-5, जहॉंगीर-3, दीनानाथ मंगेशकर-2 तर पूना हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण उपचार घेत आहे. बुधवारी (दि. 9) दिवसभरात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 रुग्ण नायडू, तर 5 रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या 1 हजार 815 व्यक्तींपैकी 1 हजार 594 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 195 जणांवर विलागीकरण कक्षात उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.