पुणे – पतीशी पटल नसल्याने माहेरी आलेल्या पत्नीने पतीला मोबाईलवर ब्लॉक केले. याचा जाब विचारायला आलेल्या पतीने पत्नीला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भांडणे सोडवण्यास आलेल्या मेव्हण्यारही चाकूने वार करण्यात आला. ही घटना धायरी येथील पंचरत्न क्लासिक सोसायटीमध्ये रविवारी सकाळी घडली.
सचिन ज्ञानोबा आमले (30,रा.आमलेवाडी, घोटवडे गाव, ता.मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सचिनचा पाच वर्षापुर्वी प्रेम विवाह झाला आहे. त्यांना दो लहान मुलेही आहेत. त्याची पत्नी स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करते. तर तो सध्या काहीच काम धंदे करत नाही. त्यांच्यामध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नी माहेरी धायरी येथे निघुन आली होती. तीने सचिनचा मोबाईलनंतर ब्लॉक केला होता. यामुळे वारंवार तीला फोन करुनही सचिनचा तीच्याशी संपर्क होत नव्हता. याचा राग मनात धरुन तो रविवारी सकाळी पत्नीच्या माहेरी आला होता. तेथे त्याने तीचा मोबाईल घेऊन ब्लॉक केलेला नंबर काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोघांमध्ये वाद झाले. वादाच्या भरातच त्याने पत्नीच्या पोटात चाकू खुपसला. तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत मानेवर, दंडावर आणि बोटांवर चाकूने सपासप वार केले. त्याचा चुलत मेव्हण भांडणे सोडविण्यास आला असता, त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आले. सचिन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तनपुरे करत आहेत.