पुणे मतदानात ठरले उणे

एकूण 49.84 टक्‍के मतदान : प्रशासनाची माहिती


वडगावशेरी, शिवाजीनगरात सर्वाधिक कमी प्रतिसाद


सर्वाधिक मतदान कसबा, पर्वती मतदारसंघात

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 75 हजार 39 मतदारांपैकी 10 लाख 34 हजार 154 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुणे मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा फक्त 40 हजार 876 मतदान वाढले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दुरंगी लढत होती. या निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. एकंदर या निवडणुकीमध्ये मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला. पुणे मतदारसंघात 60 ते 70 टक्के मतदान होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र 50 टक्केही मतदान गाठता आलेली नाही.

पुणे मतदारसंघातील 10 लाख 67 हजार 587 पुरुष मतदारांपैकी 5 लाख 51 हजार 91 मतदारांनी मतदान केले. तर 10 लाख 7 हजार 372 महिला मतदारांपैकी 4 लाख 83 हजार 56 महिला मतदारांनी मतदान केले आहे. पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी 51.62 टक्के तर 47.95 टक्के महिला मतदारांनी मतदान केले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात झाले असून येथे 55.88 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वांत कमी मतदान हे शिवाजीनगर आणि वडगाव शेरी मतदारसंघात झाले असून शिवाजीनगर मध्ये 46.54 टक्के तर वडगाव शेरीमध्ये 46.41 टक्के मतदान झाले आहे. तर कोथरुडमध्ये 50.26 टक्के, पर्वतीमध्ये 52.07 टक्के आणि पुणे कॅन्टोन्मेट मध्ये 48.79 टक्के मतदान झाले आहे.

2014 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 33 हजार 859 होते. त्यापैकी 9 लाख 93 हजार 278 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 2014 मध्ये पुणे मतदारसंघात 54.11 टक्के मतदान झाले होते. तर 2019 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या तुलनेत टक्केवारीमध्ये 4.27 टक्के मतदान कमी झाल्याचे दिसत असले तरीसुध्दा मतदान केलेल्या मतदारांच्या आकडेवारीनुसार यंदा 40 हजार 876 मतदान वाढले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.