पुणे- घरगुती भांडणातून नवऱ्याने बायकोला चौथ्या मजल्यावरुन लिफ्टच्या डक्टमध्ये खाली ढकलले. यामध्ये सुदैवाने पत्नीचा जीव वाचला. मात्र मणक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे.
शैला दहिरे (25,रा.कोंढवा बुद्रुक) असे जखमी महिलेचे नाव आहे. तीच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती नितीन दहिरे (32) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नितीन हा पेटींगची कामे करतो. त्याने इतर मित्र व नातेवाईकांसह पाच ते सहा गुंठे जागा काकडे वस्ती येथे घेऊन ठेवली आहे. या ठिकाणी जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांनी इमारत बांधली आहे सहा मजली इमारतीचे अर्धवट बांधकाम झाले आहे. सध्या तेथेच तो पत्नीसह रहात आहे. त्यांच्या इमारतीच्या लाईट फिटींगचे काम आठ दिवसांपुर्वी झाले होते. हे काम त्याने सांगितल्याप्रमाणे झाले नाही. याबद्दल पत्नीने सुपरवायजरला जाब का विचारला नाही असा आक्षेप घेत तो पत्नीशी भांडला. यानंतर दारु पिऊन येत त्याने पत्नीला मारहाण करत चौथ्या मजल्यावरुन लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलले. सुदैवाने लिफ्टच्या डक्टमध्ये वाळूचा मलबा तीन ते चार फुटांपर्यंत पडला होता. यामुळे चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्यावर शैला यांना मोठा अपघात झाला नाही. मात्र त्यांच्या कमरेचे हाड मोडले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करत आहेत.