पुणे – कोरोना महामारीशी संपूर्ण देश संघर्ष करत असताना मोदी सरकारने महागाई वाढविण्यावर आणि स्वतःच्या महालावर हजारो कोटी खर्च करण्यावर भर दिला आहे. मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज राज्यभर कोरोना नियमांचे पालन करुन आंदोलन सुरु केले आहे. प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुणे येथे गॅस सिलिंडर आणि दुचाकी गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदविला आणि या आंदोलनाची सुरुवात केली.
देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचं, अच्छे दिनच स्वप्न दाखवलं. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्र सरकारचा, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
आज पुणे शहरात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणी वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार ,श्वेता होनराव व महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गॅस सिलिंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदविला, अशी देखील माहिती प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांनी दिली आहे.