पुण्यात निकृष्ट दर्जाच्या कोरोना तपासणी कीट वापरल्या – प्रवीण दरेकर

मुंबई – करोनाच्या चाचणीसाठी जालना आणि पुणे जिल्ह्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या आरटी-पीसीआर किट्‌स वापरण्यात आल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणी केल्यानंतर या किटस्‌ निकृष्ट असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

करोना चाचणीसाठी वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या किट्‌ससंदर्भात प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 1 ऑक्‍टोबरपर्यंत भारत सरकारने आरटी-पीसीआर किट्‌सचा पुरवठा केला. यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. पण 1 ऑक्‍टोबरपासून राज्य सरकारने खरेदी सुरू करताच अडचणी निर्माण झाल्या. कारण वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या डीएमईआरने या निकृष्ट दर्जाच्या किट्‌स खरेदी केल्या होत्या. या किट्‌स आरोग्य संचालनालयमार्फत सर्व जिल्हा पातळीवर पोहचवल्या. परंतु, करोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आल्याने ही बाब लक्षात आली, असे दरेकर म्हणाले.

आरटी-पीसीआर किट्‌स यायच्या अगोदर जालना जिल्ह्यामध्ये 25 टक्‍क्‍यांच्या दरम्यान पॉझिटिव्हीटी रेट होता. परंतु, या किट्‌स वापरल्यानंतर हा रेट 5 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला. त्यामुळे संशय निर्माण झाल्यामुळे डॉ. हयात नगरकर यांनी याची तक्रार आयसीएमआर, राष्ट्रीय विषाणू संस्था आणि सिव्हिल सर्जन, जालना यांच्याकडे केल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.