पुणे – शहरातील करोना बाधितांचा दर जो दोन-तीन टक्केच झाला होता तो आता 28 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. बाधितदर पाच टक्क्यांपेक्षा कमी आल्यानंतर शहरातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. तरीही बरेच दिवस पुणे शहर हे दुसऱ्या टप्प्यातच होते. कसेबसे त्यातून बाहेर पडल्यानंतर डिसेंबरमध्ये बाधितांची संख्या पुन्हा वाढण्याला सुरूवात झाली आता हा दर 28 टक्क्यांवर गेला आहे.
गेल्या 24 तासांत 5 हजार 375 नवे बाधित आढळले आहेत. तर शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शहर हद्दीबाहेरील तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचा समावेश करून आजपर्यंत 9 हजार 141 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 41 लाख 6 हजार 614 संशयितांच्या टेस्ट झाल्या आहेत. त्यात 5 लाख 59 हजार 549 जण बाधित आढळले आहेत. त्यातील 5 लाख 16 हजार 221 बाधित बरे झाले आहेत. रविवारी 19 हजार 119 संशयितांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सध्या सक्रीय बाधितांची संख्या 34 हजार 187 असून, त्यातील 217 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर 22 जण व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय 24 जणांना इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.