पुणे, दि. 2 -घराची खोली नावावर करून देण्याच्या वादातून लहान भावाला सख्ख्या बहीण-भावंडांनीच मित्राच्या मदातीने मारहाण केली. यानंतर त्यांनी कॅनॉलमध्ये ढकलून देत त्याचा खून केला. पोलिसांच्या शोधमोहिमेमुळे पाच वर्षांनंतर या खुनाचा उलगडा झाला. गुन्हे शाखा युनिट-तीनने हे प्रकरण उघडकीस आणले. त्यासाठी पोलिसांनी तब्बल 100 आकस्मिक मृत्यूंची तपासणी अन् वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासानंतर या खुनाला वाचा फुटली आहे.
पंकज चंद्रकांत दिघे (वय 23, एरंडवणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, कॅनॉलमध्ये ढकलून देणारा मित्र महेश बाबुराव धनावडे (वय 37, शिवणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पंकजचा भाऊ सुहास चंद्रकांत दिघे (वय 29), त्याची बहीण यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास, पंकज आणि एक महिला हे भाऊ-बहिण आहेत. पंकजला आणखी तीन बहिणी आहेत. दिघे कुटूंब एरंडवणा परिसरात राहत होते.
राहत्या घरातील एक खोली माझ्या नावावर करा, असे म्हणून पंकज वाद घालत होता. त्यामुळे सुहास व आश्विनी यांनी त्याला मारण्याचा कट रचला. दि. 14 मार्च 2017 रोजी सायंकाळी मित्र महेश व प्रशांत यांच्या मदतीने पंकजला चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर महेशच्या कारमध्ये त्याला घालून डेक्कनमधील कॅनॉलमध्ये ढकलून देत त्याचा खून केला. त्यानंतर काही दिवसांनी पंकज हरवल्याची तक्रार डेक्कन पोलिसांकडे भाऊ सुहासने दिली. दरम्यान, पंकजचा मृतदेह हडपसर येथील कॅनॉलमध्ये मिळून आला.
असा गुन्ह्याचा लावला छडा
गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना बातमीदारामार्फत पंकजसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या सूचनेनुसार तपासाला सुरूवात केली. पंकजच्या बेपत्ताची तक्रार डेक्कन येथे दाखल असल्याचे समजले. तपासाला गती मिळताच घटना पाहिलेला एक प्रत्यक्षदर्शी देखील सापडला. त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर आरोपी महेश धनावडे याला ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्याने घटनेची माहिती दिली. त्यानूसार या खुनाचा उलगडा झाला. पोलीस निरीक्षक अनिता मोरे व पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.