पुण्यात डॉक्‍टर महिलेला हत्येची धमकी देत मागितली 5 लाखांची खंडणी

डॉक्‍टर महिलेची तक्रार : आरोपी 24 तासांत गजाआड

पुणे – ‘तुमची आणि मुलाच्या हत्येची तुमच्या पतीने पाच लाखांना मला सुपारी दिली आहे. मात्र, मुलांच्या हत्येची सुपारी मी घेत नाही. मुलाला वाचवायचे असेल तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील,’ असे म्हणत खुनाच्या धमकीने खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी, बिबवेवाडी-कोंढवा रोड परिसरातील एका डॉक्‍टर महिलेने मार्केट यार्ड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी राकेश नरेश पाटील (रा. सय्यदनगर, मूळ छत्तीसगड) याला बेड्या ठोकल्या आहेत.

फिर्यादी महिलेचे बिबवेवाडी कोंढवा परिसरात क्‍लिनिक आहे. सोमवारी (दि.11) सकाळी त्यांच्या मोबाइलवर एका व्यक्तीने फोन करून “तुमची आणि मुलाच्या हत्येची तुमच्या पतीने पाच लाखांना मला सुपारी दिली आहे. मात्र, मुलांच्या हत्येची सुपारी मी घेत नाही. मुलाला वाचवायचे असेल तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील,’ असे हिंदीत सांगितले.

तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे तपास करताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांना बातमी मिळाली होती की, फोनद्वारे खंडणीची मागणी करणारा संशयित व्यक्ती सय्यदनगर परिसरातील बांधकाम साइटवर काम करतो आहे. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून राकेशला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी अनिस शेख, स्वप्नील कदम, घुले यांच्या पथकाने केली.

…असा सापडला जाळ्यात
आरोपी राकेश पाटील हा सय्यदनगर येथील बांधकाम साइटवर असल्याची माहिती मार्केट यार्ड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी करोना सेवकाच्या वेशात बांधकाम साइटवर धडक मारली. त्यानंतर तेथील कामगारांना विश्‍वासात घेत करोना सर्व्हेसाठी आल्याचे सांगत मोबाइल क्रमांक घेऊन तपासणी केली. त्यावेळी राकेश पाटीलच्या मोबाइलमध्ये डॉक्‍टर महिलेचा संपर्क क्रमांक आढळला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.