आतापर्यंत 18 लाख 29 हजार जणांच्या चाचण्या : 1 लाख 59 हजार बाधित
राज्यामध्ये सव्वाकोटी चाचण्यांचा टप्पा पार
पुणे – पुण्यामध्ये आतापर्यंत सरकारी आणि खासगी रुग्णालयात, पॅथॉलॉजी लॅबमध्ये 18 लाख 29 हजार जणांनी चाचण्या केल्या असून त्यापैकी 1 लाख 59 हजार जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असून, ही टक्केवारी 19 टक्के आहे.
राज्यामध्ये करोनाच्या सुमारे सव्वाकोटी चाचण्यांचा टप्पा पार झाला असून, त्यातील 15 टक्के म्हणजे 19 लाख 13 हजार चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दर दहा लाख लोकसंख्येमागे पुण्यात चाचण्यांचे गुणोत्तराचे प्रमाणही जास्त आहे. तर, महाराष्ट्रात आणि देशात हे प्रमाण कमी आहे. यामध्ये महाराष्ट्रात 71 हजार, तर देशात 85 हजार इतके आहे.
राज्यात आतापर्यंत सरकारी आणि खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांमधून 1 कोटी 24 लाख संशयितांनी करोना टेस्ट केली आहे. त्यामध्ये पुण्यातील 18 लाख 29 हजार इतक्या चाचण्यांचा समावेश आहे. राज्यात करण्यात आलेल्या 1 कोटी 24 लाख 1 हजार चाचण्यांपैकी 19 लाख 13 हजार 382 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 1 कोटी 4 लाख 88 हजार 255 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर देशात 1 कोटी 1 लाख 46 हजार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात आतापर्यंत आढळलेल्या 19 लाख 13 हजार रुग्णांपैकी 18 लाख 6 हजार 298 म्हणजेच 94.4 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर, देशात आढळलेल्या 1 कोटी 1 लाख रुग्णांपैकी 97 लाख 17 हजार म्हणजे 95 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर, देशात 1 लाख 47 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील 49 हजार 129 रुग्णांचा समावेश आहे. यावरून देशाचा मृत्यूदर 1.45 टक्के तर राज्याचा 2.57 टक्के इतका आहे.