व्यावसायिक कचाट्यात, बेशिस्त वाहनचालक मोकाट

शिरूर शहरात नगर परिषद, पोलिसांची कारवाई चर्चेत : नागरिकांमधून संताप

शिरूर – शिरूर शहरात बेशिस्त पार्किंगला धरबंदच राहिला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा खोळंबा होत आहे. बुधवारी (दि. 29) एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर शिरूर शहरातून अवजड वाहने नेण्यास बंदी आणावी, अशी मागणीही संतप्त नागरिकांतून ऐरणीवर आली आहे.

अपघातानंतर नगरपरिषदेने आपला राग रस्त्याचा कडेला उभ्या असलेल्या व्यावसायिकांवर काढला. परंतु बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना मात्र त्यांनी अभय दिला आहे. त्यामुळे नगर परिषदेचा राग “वड्याचे तेल वांग्यावर’ अशी झाली आहे.

जेथे व्यावसायिकांच्या गाड्या, टपऱ्या काढल्या आहेत. त्याची जागा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी घेतली आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु कारवाई करण्यापूर्वी हे वाहनचालक नेते, आमदार, खासदारांच्या स्थानिक पुढाऱ्यांची नावे घेऊन किंवा त्यांना फोन करून वाहने घेऊन जात आहेत.

त्यामुळे पोलिसांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील पाबळ फाटा ते शिरूर पोलीस स्टेशन रस्त्यावर पाबळ फाटा, बाजार समिती आवारात पेट्रोल पंप, एसटी स्टॅंड, इंदिरा गांधी पुतळा, पोस्ट कार्यालय, विद्याधाम प्रशाला, बागवाननगर, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयासमोर बेशिस्त वाहनचालकांचे दर्शन दररोज घडत आहे. मनमानी पद्धतीने गाड्या रस्त्यावर लावून हे वाहन चालक दोन- तीन तास गायब होतात. परंतु त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शिरुर शाळेचा हा प्रमुख रस्ता दीड किलोमीटरचा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरातून रोज ये-जा करणारे 700 एसटी बसेस आहेत. शिरूर, पारनेर, श्रीगोंदा या तीनही तालुक्‍यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक याठिकाणी येतात. त्यामुळे हा रस्ता नेहमीच वाहनांनी गजबजलेला आहे.

परंतु याच रस्त्यावर दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहने पार्क केली जातात. ही वाहने पार करताना चारचाकी वाहन चालक अर्ध्या रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहन जाण्यासाठी रस्ता अपुरा पडत आहे. शिरूर नगरपालिका कार्यालय ते एसटी स्टॅंड परिसरात वाहने पार्क केल्यामुळे वाहनांचा खोळंबा होत आहे. यासाठी शिरूर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे, असा सूर उमटत आहे.

शिरूर शहरात इंदिरा गांधी पुतळा ते एसटी बसस्थानक परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहने बेशिस्तपणे गाड्या पार्किंग करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. अनेकवेळा वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. अपघातानंतर नगरपरिषद कार्यालयासमोर पार्किंग केलेली वाहने कारणीभूत आहेत. परंतु नगर परिषद व पोलीस विभाग याचा राग स्थानिक गोरगरीब व्यवसाय करणाऱ्यांवर काढत आहे.
– सुनील जाधव, शहर प्रमुख, युवासेना.

शिरूर शहरातून नेहमीच अवजड वाहने, व्हॉल्वा ट्रक, उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्‍टरची ये- जा होत आहे. त्यामुळे आधीच कमी असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. शहराला बाह्य रस्ता आहे. मात्र, मुद्दाम शहरातून अवजड वाहने घेऊन जात आहे. या अवजड वाहनांना शहरातून येण्यास बंदी करावी.
– महेबूब सय्यद, जिल्हा उपप्रमुख, मनसे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.