पंतप्रधानांसह अजित डोभाल यांच्यावर दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत

30 संवेदनशील शहरांमध्ये पोलिसांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांचे विशेष पथक तयार करत आहे. गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे. जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा एक अधिकारी यामध्ये जैशला मदत करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान आणि डोभाल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात जैशचा अतिरेकी शमशेर वानी आणि त्याचा गुरू यांच्यात झालेल्या लेखी संभाषणाची माहिती परदेशी गुप्तचर संस्थेला देण्यात आली. जिथून ही माहिती भारतीय गुप्तचर अधिका-यांना मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये हे दहशतवादी मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच जम्मू, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर आणि लखनऊसह एकूण 30 संवेदनशील शहरांमध्ये पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या उरी कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाक सीमेत प्रवेश करून सर्जिकल स्ट्राईकच्या रणनीतीत आणि बालाकोटमधील जैशच्या प्रशिक्षण शिबिरात हवाई हल्ल्यात अजित डोभाल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.