करोनापासून बचावासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये करणार परिधान
पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्वच स्तरावर सुरक्षाविषयक खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेचे तिकीट तपासणीस पीपीई किटसह हातमोजे, मास्क, फेसशिल्ड वापरून काम पाहणार आहेत. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच “टीसी’ वेगळ्या पोषाखात दिसणार आहेत. मध्य रेल्वेतील तिकीट तपासणीसांनी पीपीई किट परिधानकरून कामाला सुरुवात केली आहे.
लॉकडाऊन 5 मध्ये देशभरातून 200 गाड्या सोडण्यात येत आहेत. विविध विभागांतून धावणाऱ्या या गाड्यांतील कर्मचारी तिकीट तपासणी करताना सुरक्षाविषयक खबरदारी घेत आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांना स्वत:च्या नावाचा बिल्ला बाळगणे आवश्यक आहे.
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नेहमी काळा कोट, टाय या पोषाखामध्ये दिसणारे रेल्वे कर्मचारी, आता हातात मोजे, मास्क, फेसशिल्ड वापरून सध्या काम करत आहेत. तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणीस पीपीई कीटदेखील वापरत आहेत.
यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमधील थेट संपर्क टाळण्यास मदत होणार आहे. मुंबई विभागातील तैनात कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-भुवनेश्वर या मार्गावर धावणाऱ्या गाडीमध्ये पीपीई किट घालून काम केले.